मराठी मनावर अधिराज्य गाजवण्यास ‘अमित्रियान’ झेपावणार!
By Admin | Updated: October 23, 2015 03:10 IST2015-10-23T03:10:26+5:302015-10-23T03:10:26+5:30
हुकूमाचे एखादे पान हातात ठेवावे त्याप्रमाणे चित्रपटातील एखादा कलाकार प्रमोशनपासून दूर ठेवायचा आणि प्रेक्षकांना सुखद धक्का द्यायचा प्रयोग ‘राजवाडे अॅँड सन्स’मध्ये

मराठी मनावर अधिराज्य गाजवण्यास ‘अमित्रियान’ झेपावणार!
हुकूमाचे एखादे पान हातात ठेवावे त्याप्रमाणे चित्रपटातील एखादा कलाकार प्रमोशनपासून दूर ठेवायचा आणि प्रेक्षकांना सुखद धक्का द्यायचा प्रयोग ‘राजवाडे अॅँड सन्स’मध्ये करण्यात आला आहे. बॉलिवूड गाजविलेल्या आणि रामगोपाल वर्मा, संगीत सिवनसारख्यांनी नावाजलेल्या अमित्रियानने साकारलेला चित्रपट प्रेक्षकांसाठी सुखद धक्का ठरत आहे.
सचिन कुंडलकर लिखित-दिग्दर्शित ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटात अमित्रियान उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाची भूमिका साकारतो आहे. जुन्या पिढीचा जुना आग्रह आणि नवीन पिढीची महत्त्वाकांक्षा... या दोन्हीतली तफावत या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. जुन्या - नव्या पिढीतले वैचारिक अंतर...त्यामुळे माजणारा कोलाहल... राजवाडे कुटुंबीयांवर पडलेलं हे सावट अमित्रियानने साकारलेला विक्रम राजवाडे आपल्या मिश्किल आणि मनमिळावू स्वभावामुळे कसा दूर करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिनेसृष्टीतल्या दिग्गजांकडूनही अमित्रियानचा विक्रम वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
राजवाडे अँड सन्स या चित्रपटासाठी जेव्हा अमित्रियानला विचारण्यात आलं तेव्हा मराठी ही मातृभाषा असल्यामुळे त्याने ताबडतोब होकार दिला. ‘या निमित्ताने मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधीही त्याला चुकवायची नव्हती. मराठमोळ्या अमित्रियानने बॉलिवूडमध्येही आपलं नाणं चोख वाजवलं आहे. ‘मुंबई टू इंडिया’, ‘सत्या २’मध्येही त्याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘मन्या -दि वंडरबॉय’साठी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणासाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.