अमृता पाटील-ठाकरेची भरारी सातासमुद्रापार!

By Admin | Updated: May 7, 2016 04:37 IST2016-05-07T04:37:45+5:302016-05-07T04:37:45+5:30

नवी मुंबईत लहानाची मोठी झालेली, अमरावती हे सासर असलेली अमृता पाटील-ठाकरे हिने ‘मिसेस. इंडिया यूएस २०१६’ हा किताब पटकावला आहे. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत

Amrita Patil-Thackeray's brother-in-law! | अमृता पाटील-ठाकरेची भरारी सातासमुद्रापार!

अमृता पाटील-ठाकरेची भरारी सातासमुद्रापार!

नवी मुंबईत लहानाची मोठी झालेली, अमरावती हे सासर असलेली अमृता पाटील-ठाकरे हिने ‘मिसेस. इंडिया यूएस २०१६’ हा किताब पटकावला आहे. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत ही स्पर्धा झाली. १२ फेब्रुवारीला तिला हा किताब प्रदान करण्यात आला. अतिशय सामान्य घरातून आलेल्या मुलीचा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. या तिच्या यशात तिच्या पतीचा, सासू-सासऱ्यांचा आणि आई-वडिलांचा मोठा हात आहे असं ती सांगते. या तिच्या भरारीबाबत सीएनएक्सच्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी अमृताने मारलेल्या गप्पा..

प्रश्न : तुला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती का?
मी सर्वसाधारण मराठी कुटुंबातील मुलगी आहे. माझी आई नवी मुंबई महानगरपालिकेत लेखापाल म्हणून काम करते तर माझे वडील मुंबई सेंट्रल येथील एस.टी. को-आॅपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर आहेत. माझे सगळे बालपण वाशीत गेले. मी माझे बारावीपर्यंतचे शिक्षण वाशीच्याच मॉडर्न कॉलेजमधून पूर्ण केले. मॉडेलिंग, अभिनय करण्याची मला नेहमीपासून आवड होती. पण माझ्या घरातले वातावरण तशा प्रकारचे नसल्याने मी कधी कोणाला ही गोष्ट सांगायचीही हिंमत केली नाही. मी खूप लाजाळू होती; तसेच माझ्यात आत्मविश्वासही खूप कमी होता.

प्रश्न : अमेरिकेत सर्वप्रथम गेल्यावर तिथला तुझा अनुभव कसा होता?
- हा अनुभव खूप छान होता. सुरुवातीला मी एक विद्यार्थिनी म्हणून अमेरिकेला गेली, त्या वेळेचा काळ खूप खडतर होता. माझ्या कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडू नये यासाठी तिथे गेल्यावर १८व्या वर्षापासूनच मी नोकरी करायला सुरुवात केली. आता तर मी तिथेच स्थायिक झाली आहे. अमेरिकेतली एक गोष्ट मला फार आवडते. तिथले सरकार तुम्ही भरलेल्या टॅक्सच्या बदल्यात तुम्हाला मोफत वाचनालय, चांगले रस्ते यांसारख्या अनेक सुविधा देतं. पण दुसरीकडे मी भारतापासून खूप दूर असल्याने भारतातील मोठाली कुटुंबं, सण, जेवण, संस्कृती यांची मला उणीव भासते.

प्रश्न : तू तिथे रेस्पिरेशन थेरपिस्ट म्हणून काम करतेस, तुझ्या कामाबद्दल काही सांग.
- मी अमेरिकेच्या लष्करासोबत सहा वर्षे काम केलं. त्या काळात मी रेस्पिरेशन थेरपिस्ट म्हणून काम केले. पण सध्या मी क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करत आहे. तसंच केसी डेसी वॉर्डरुब असे माझे एक आॅनलाइन बुटिक आहे. या बुटिकमध्ये भारतीय पारंपरिक आणि लग्नसमारंभाचे कपडे मिळतात.

प्रश्न : तू कधी कोणत्या अभिनयाच्या स्पर्धेत भाग घेतला होतास का?
- मला अभिनयाचा कोणताही अनुभव नाही. पण भविष्यात अभिनय करण्याचे मी ठरवले आहे. यासाठी मी भारतातही येण्याचा विचार करत आहे. ‘मिसेस. इंडिया यूएस’ हा किताब मिळवल्यानंतर मला सीमा मेहता, विक्रम फडणवीस, अनिता डोंगरे यांसारख्या डिझायनरसाठी रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली.

प्रश्न : तू हा निर्णय घेतल्यावर तुझ्या कुटुंबातील लोकांची काय प्रतिक्रिया होती?
- सुरुवातीला माझ्या या निर्णयाला माझ्या आईवडिलांपेक्षाही माझ्या नवऱ्याने आणि सासू-सासऱ्यांनी जास्त पाठिंबा दिला. माझे सासू-सासरे दोघेही डॉक्टर आहेत. माझे सासरे डॉ. सुरेश ठाकरे हे लहान मुलांचे डॉक्टर आहेत तर माझी सासू डॉ. आशा ठाकरे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझे आईवडील हे मुंबईतील तर माझे सासू-सासरे अमरावती या छोट्या शहारातले आहेत. पण तरीही माझ्या आईवडिलांपेक्षा ते जास्त उत्सुक होते. माझ्या कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाल्यावर ही गोष्ट मी माझ्या मित्रमंडळींना आणि नातेवाइकांना सांगितली. मी माझ्या आईला कशा प्रकारे तयार केले हे खूपच गमतीशीर आहे. मी माझ्या आईला सांगितले, सौंदर्यस्पर्धेत मी भाग घेणे तुला मूर्खपणाचे नक्कीच वाटत असेल. पण या मूर्खपणात मला माझ्या नवऱ्याची आणि सासू-सासऱ्यांची पूर्णपणे सोबत लाभली आहे. त्यामुळे तुही मला यासाठी परवानगी दे.

प्रश्न : तुझ्या यशात तुझ्या पतीचा किती वाटा आहे?
- माझे पती क्लिनिकल रिसर्चमध्ये स्टॅटिस्टिकल प्रोग्रामर म्हणून काम करतात. नोकरी करण्यासोबतच ते मला घरातही तितकीच मदत करतात. आम्ही दोघं घरात एकमेकांना समान वागणूक देतो. आम्ही दोघेही बाहेर काम करून पैसे कमवतो; पण त्याचसोबत घरातील कामेही एकत्रितपणे करतो. आमच्या मुलासाठी दोघेही तितकाच वेळ देतो. माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच मला प्रोत्साहन देत असतात.

प्रश्न : तुमचे लग्नानंतरचे यूएसमधले आयुष्य कसे आहे?
- मी सोमवार ते शुक्रवार ९ ते ५ या वेळात क्लिनिकल रिसर्चमध्ये नोकरी करते. संध्याकाळी घरी आल्यावर एखाद्या गृहिणीप्रमाणे जेवण बनवते. आम्ही येथील गणपतीच्या देवळात किंवा कॅन्सास शहराच्या महाराष्ट्र मंडळामार्फत सगळे सणही साजरे करतो. येथे सणांच्या दिवशी सुट्टी नसल्याने त्या आठवड्याच्या विकेंडला सण साजरे केले जातात. मी आठवड्यातील तीन दिवस तरी न चुकता व्यायाम करते.

- janhavi.samant@lokmat.com

Web Title: Amrita Patil-Thackeray's brother-in-law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.