'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:56 IST2025-05-05T12:56:03+5:302025-05-05T12:56:33+5:30
अलका कुबल यांचं दिसणंच आड आलं? संजय लीला भन्साळी नक्की काय म्हणाले वाचा...

'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांचं नाव घेताच 'माहेरची साडी' सिनेमा आठवतो. १९९१ साली आलेल्या सिनेमाला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. अलका कुबल यांची मात्र त्यामुळे रडूबाई अशीच प्रतिमा जाली होती. सिनेमात त्यांचे बरेच रडता नाचेच सीन्स आहेत. नंतरही त्यांना अशाच भूमिका सतत ऑफर होत गेल्या. तुम्हाला माहितीये का संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' मध्येही त्या दिसल्या असत्या. मग नक्की असं काय झालं की त्यांना भूमिका मिळू शकली नाही?
संजय लीला भन्साळींसोबत भेटीचा किस्सा
अलका कुबल यांनी नुकतंच संजय लीला भन्साळींसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, "माझी नकारात्मक भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. पण मला तशा भूमिका आल्या नाहीत. संजय लीला भन्साळींनी माझा बाजीराव मस्तानी तील एका भूमिकेसाठी विचार केला होता. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते मला पाहून म्हणाले, 'तुम्हारा चेहरा तो बहुत सोबर है.' माझ्या सोज्वळ दिसण्यामुळे त्यांनी मला सिनेमात घेतलं नाही. म्हणजे तुमच्या गोड दिसण्यामुळेही तुमचं नुकसान होऊ शकतं हे माझ्या लक्षात आलं."
त्या पुढे म्हणाल्या, "यानिमित्ताने मी त्यांना भेटले याचाही मला आनंद आहे. आम्ही तासभर गप्पाही मारल्या. त्यांना भेटून खूप छान वाटलं. ती माझ्यासाठी अतिशय गोड आठवण आहे." अलका कुबल यांना सिनेमात ऑफर झालेली भूमिका नंतर तन्वी आजमी यांनी केली होती.
अलका कुबल सध्या 'वजनदार' नाटकामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांच्या नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर त्या पुन्हा रंचमंचावर आल्या आहेत. 'वजनदार' नाटकाचं पोस्टर पाहून हे नाटक एका महिलेवर आधारीत आहे, जी वजन घटवण्यासाठी काय-काय प्रयत्न करणार आणि त्या प्रवासात तिला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, हे पाहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन संपदा जोगेळेकर-कुळकर्णीने केले आहे. यात अलका कुबल यांच्या व्यतिरिक्त अभिषेक देशमुख, साक्षी पाटील, अभय जोशी आणि पूनम सरोदे हे कलाकार दिसणार आहेत.