‘निळकंठ मास्तर’च्या नव्या अध्यायासाठी अजय-अतुल सज्ज
By Admin | Updated: July 29, 2015 03:56 IST2015-07-29T03:56:25+5:302015-07-29T03:56:25+5:30
देशप्रेमाबरोबरच देशभक्तांच्या मनात रुजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आगामी चित्रपट ‘निळकंठ मास्तर’ची निर्मिती मेघमाला बलभीम

‘निळकंठ मास्तर’च्या नव्या अध्यायासाठी अजय-अतुल सज्ज
देशप्रेमाबरोबरच देशभक्तांच्या मनात रुजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आगामी चित्रपट ‘निळकंठ मास्तर’ची निर्मिती मेघमाला बलभीम पठारे यांनी केली आहे. या सुंदर नात्याची चित्रपटातून उलगडत जाणारी घडी गजेंद्र अहिरेंनी उत्तम बसवली आहे. चित्रपटाचा गाभा ओळखून त्या काळातलं संगीत देण्याचं शिवधनुष्य अजय-अतुल यांनी लीलया पेललं आहे. गजेंद्र अहिरेंची गीतरचना लाभलेल्या या चित्रपटासाठी हिंदी-मराठीतले अनेक दिग्गज एकत्र आले आहेत. चित्रपटात एकंदर पाच गाणी आहेत. देशप्रेमाची गाथा सांगणाऱ्या या ‘वंदे मातरम’ या गाण्याला तब्बल अठरा गायकांनी आवाज दिला आहे. तर प्रियकरासाठीची ओढ ‘अधिर मन झाले’ या गाण्यातून श्रेया घोषाल हिनं व्यक्त केली आहे. देशप्रेमाने झपाटलेल्या आपल्या सख्याला साद घालणारं ‘परतुनी ये ना’ या गाण्यासाठी हिंदीतील जावेद अली व श्रेया घोषाल मराठीत एकत्र आले आहेत. ‘कौनसे देस चला’ या गाण्यातून देशासाठी झटणाऱ्या तरुणाईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. संगीतकार अजय गोगावले यांनी या गाण्याला आवाज दिलाय, चित्रपटाच्या गीतांबरोबरच या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ही तितकंच मनाला भावतं. आनंदी जोशी आणि आदित्य मोडक या गायकांनी चित्रपटाच्या पार्श्वसंगीतातल्या ओळी गुणगुणल्या आहेत.