अजान वाद - सोनू निगमने केले आणखी एक ट्विट
By Admin | Updated: April 23, 2017 10:34 IST2017-04-23T10:23:34+5:302017-04-23T10:34:30+5:30
मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने आज पुन्हा एक ट्विट करत वादात तेल ओतले आहे.

अजान वाद - सोनू निगमने केले आणखी एक ट्विट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 : मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने आज पुन्हा एक ट्विट करत वादात तेल ओतले आहे. आज पहाटे सोनूने त्याच्या घरातून ऐकू येणाऱ्या अजानचा एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्विट सोनू निगमने 17 एप्रिल रोजी केले होते. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी तर निगमविरोधात इशारा देऊन, सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी पुण्यात सोनूविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे सोनू निगमला संरक्षण देण्यात आले.
दरम्यान, मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
तर दुसरीकडे यासंदर्भात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारन मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय कधी घेणार?, असा सवाल सामना संपादकीयमधून उपस्थित केला होता. मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध लाखो तक्रारी गेल्या अनेक वर्षांत सरकारदफ्तरी दाखल झाल्या आणि धूळ खात पडल्या आहेत. त्यावर निर्णय कधी होणार असा सवाल त्यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केलो हाता. अग्रलेखातून उपस्थित केला होता.
सोनू निगमवर लष्कर न्यायालयात खटला
गायक सोनू निगम (अंधेरी, मुंबई) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लष्कर न्यायालयात त्यांच्यावर खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल वाय. पी. पुजारी यांच्या न्यायालयाने २४ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. अन्वर हुसेन बुडन शेख (बोपोडी) यांनी अॅड. वाजेद खान (बीडकर) यांच्यातर्फे हा खटला दाखल केला असून भारतीय दंडविधानाच्या कलम १५३ ए आणि २९५ ए नुसार हा खटला दाखल करण्यात आला असून त्याचा क्रमांक १२९३/१७ आहे.
सोनू निगमच्या वादग्रस्त ट्विटनंतर प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा अजानबद्दल बोलत आहे. गंगाजल चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत प्रियांका चोप्रा सांगत आहे की, "संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे". प्रियांकाने सांगितल्यानुसार अजान तिच्या कानामध्ये संगीताप्रमाणे वाजायचं.
सोनू निगमच्या वक्तव्यावर बॉलिवूड सेलिब्रेटिजमध्ये फूट
सोनू निगमच्या वक्तव्यावर बॉलिवूड सेलिब्रेटिजमध्ये फूट पाहायला मिळाली. एकीकडे संगीत दिग्दर्शक वाजिद खानने सोनूच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर गायक मिका सिंहने त्याला घर बदलण्याचा सल्ला दिला आहे.
कंगना राणौतची अजान वादात उडी
मी कोणाच्यावतीने बोलणार नाही पण अजान मला आवडते. मी लखनऊमध्ये शूटिंग करत असताना मशिदीमधून दिल्या जाणा-या अजानचा आवाज मला आवडायचा. गुरुव्दारा, मंदिर किंवा मशिदीमध्ये होणारे धार्मिक कार्य मला आवडते. मी या सर्व ठिकाणी गेली आहे. आपण ख्रिश्चनांच्या प्रार्थनेलाही जातो असे कंगनाने म्हटले आहे. अजानबद्दल माझे हे व्यक्तीगत मत आहे पण म्हणून सोनू निगम जे म्हणतोय ते चुकीचे आहे, त्याचा विचार करु नये असे मी म्हणणार नाही. त्याचे ते व्यक्तीगत मत आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. यावर चर्चा झाली पाहिजे असे कंगनाने सांगितले.
Goodmorning India pic.twitter.com/gG8lqPZTSQ— Sonu Nigam (@sonunigam) April 23, 2017
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.
या ट्विटनंतर मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला होता. सोनू निगमचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे सोनू निगमने आपला मुस्लिम मित्र हकिम आलीम याच्याकडूनच आपले केस कापून घेत सय्यद शाह आतेफ अली कादरी यांना जशास तसं उत्तर दिलं.