‘ब्रेक अप के बाद’ पुन्हा नवा डाव !
By Admin | Updated: January 14, 2016 02:55 IST2016-01-14T02:55:02+5:302016-01-14T02:55:02+5:30
सेलीब्रिटींच्या विश्वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढ्या भावलेल्या असतात, की त्यांनी रिअल लाइफमध्येदेखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असते.

‘ब्रेक अप के बाद’ पुन्हा नवा डाव !
सेलीब्रिटींच्या विश्वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढ्या भावलेल्या असतात, की त्यांनी रिअल लाइफमध्येदेखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असते. अनेकदा असे घडतेही. परंतु पुढे काहीतरी बिनसते आणि मेड फॉर इच अदर वाटणाऱ्या या जोड्या एका क्षणात वेगळ्याही होतात. पण म्हणून काही ते विरहाच्या दु:खात अश्रू गाळत बसत नाहीत. मनासारखा नवा जोडीदार शोधतात अन् प्रेमाचे ते सोनेरी क्षण पुन्हा भरभरून जगतात. प्रेमभंगाचे दु:ख पचवून पुन्हा नवा डाव मांडणाऱ्या अशाच काही जोड्यांची ही प्रेमकथा...
अनुष्का शर्मा-विराट कोहली
अनुष्का शर्मा ही ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘बॅँड बाजा बरात’ या दोन चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाली. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करायची संधी मिळाली. पुढे रणवीर सिंगसोबत ती ‘बॅँड बाजा बरात’ या चित्रपटात झळकली. त्यानंतर ती रणवीरच्या प्रेमात पडल्याची चर्चाही रंगली लागली. तुम्हाला कॉफी विथ करणच्या तिसऱ्या सिझनमधील त्यांची मुलाखत आठवत असेल. यामध्ये जेव्हा त्यांना या नात्याबाबत प्रश्न विचारले गेले तेव्हा दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. पण, पुढे फार काही झाले नाही. एका जाहिरातीच्या निमित्ताने आणि विराट कोहली - अनुष्का एकत्र आले. या जोडीची चर्चा रंगू लागली. अनुष्काने कॉफी विथ करणच्या चवथ्या सिझनमध्ये विराटसोबतच्या संबंधाची अखेर कबुली दिली. आज ते दोघेही एकत्र आहेत.
कॅटरिना कैफ - रणबीर कपूर
प्रेमसंबंधाच्या बाबतीत सलमान खानने नेहमीच चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्याच्यासोबत ज्या नायिकांचे नाव जोडले गेले, त्यात सर्वप्रथम ऐश्वर्या आणि नंतर कॅटरिना सारख्या प्रसिद्ध नायिकांचा समावेश आहे. दुर्दैवाने सलमानला या दोघींशी दीर्घकाळ संबंध टिकवता आले नाही. ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करून सलमानला दूर केले तर आता कॅटरिना रणबीर कपूरसोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याचे स्वप्न रंगवित आहे.
करिना कपूर-सैफ अली खान
क्रिकेटच्या खेळात चांगल्या क्रिकेटपटूला ‘मॅन आॅफ द मॅच’ अवॉर्ड दिला जातो. टी-२०मध्ये तर ‘कॅच आॅफ द मॅच’हा अवॉर्डही दिला जातो. मग करिना कपूरला या दोनपैकी कुठला अवॉर्ड दिला जावा? तिने पहिल्यांदा शाहिद कपूर आणि त्यानंतर सैफ अली खान या दोघांना कॅच केले. त्यामुळे ती नक्कीच गुड कॅचर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शाहिदसोबत संबंध संपुष्टात आल्यावर तिने लगेच सैफसोबत संसार थाटला.
मान्यता - संजय दत्त
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आधी मान्यताबद्दल माहिती नसेल. पण संजूबाबामुळे ती प्रकाशझोतात आली. वास्तविक संजूबाबाचे मान्यताबरोबरचे हे तिसरे लग्न आहे. या अगोदर त्याने १९८७ साली रिचा शर्मासोबत लग्न केले होते. पुढे १९९६ साली त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर १९९८ साली रिया पिल्लेसोबत पुन्हा तो संसाराच्या बेडीत अडकला. मात्र हे लग्न देखील फार काळ टिकले नाही. २००५ मध्ये ते वेगळे झाले. अखेर २००८ साली त्याने मान्यतासोबत लग्न केले. सध्या संजूबाबा जेलमध्ये आहे. मात्र मान्यता आणि त्याच्यातील संबंध हे अधिकच दृढ होत असल्याचेच बघावयास मिळत आहे.
लारा दत्ता- महेश भूपती
मिस यनिव्हर्स हा बहुमान मिळविलेली लारा दत्ता ही केली डोरजी याच्या प्रेमात पडल्याची चर्चा होती. मात्र पुढे त्यांच्या संबंधात दुरावा आला. नंतर तिच्या आयुष्यात प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपतीचा प्रवेश झाला. पुढे त्यांनी लग्नही केले. महेश भूपती हा ग्रॅडस्लॅम जिंकणारा पहिला भारतीय आहे. आता या जोडीला एक अपत्यही आहे.
- satish.dongre@lokmat.com