अभिनेत्रींना लागले दिग्दर्शनाचे वेध
By Admin | Updated: August 20, 2015 09:21 IST2015-08-20T01:55:25+5:302015-08-20T09:21:55+5:30
आरसपाणी सौंदर्य आणि अलौकिक अभिनयाच्या बळावर रुपेरी पडदा गाजविणाऱ्या बॉलीवूडच्या अनेक नायिकांना दिग्दर्शनाच्या क्षेत्राने भुरळ घातली असून काही यात यशस्वी

अभिनेत्रींना लागले दिग्दर्शनाचे वेध
आरसपाणी सौंदर्य आणि अलौकिक अभिनयाच्या बळावर रुपेरी पडदा गाजविणाऱ्या बॉलीवूडच्या अनेक नायिकांना दिग्दर्शनाच्या क्षेत्राने भुरळ घातली असून काही यात यशस्वी झाल्या तर काहींच्या गाठीशी वाईट अनुभव आले. असे असले तरीही अनेक नायिका दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकण्यास सज्जच दिसत आहेत. यात कोण कोण आहेत पाहूयात...
चित्रपट दिग्दर्शनाची इच्छा असल्याचे नुकतेच प्रियंका चोप्राने बोलून दाखवले आहे. पहिल्यांदाच तिने इतक्या स्पष्टपणे तिची ही इच्छा जगाला सांगितली आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत हिनेसुद्धा दिग्दर्शनात उतरणार असल्याचे सांगितले होते. कंगनासाठी हे एक स्वप्न आहे.
अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे येणाऱ्या चित्रपट तारकांची बॉलीवूडमध्ये मोठी संख्या आहे. यामध्ये काहींनी दिग्दर्शनाची चांगली भूमिका बजावली तर काहींना यश मिळू शकले नाही. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात देवकी रॉयपासून शोभना समर्थ (काजलची आजी) आणि नर्गिस यांची आई जद्दनबाई यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनही केले होते. यानंतर जसजसा चित्रपटाचा काळ पुढे सरकला, तसतसे अभिनेत्रींनी यापासून दूर राहणे पसंत केले. मागच्या काळात असा प्रयोग करणाऱ्या दोन अभिनेत्रींचे नाव घेता येईल. पहिले नाव हेमा मालिनी यांचे आहे, ज्यांनी ‘दिल आशना है’ हा चित्रपट केला आणि त्यानंतर आपली मुलगी ईशा देओलसमवेत ‘टेल मी ओ खुदा’ हा चित्रपट केला.
दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर साफ आपटले. हेमानंतर दुसरे नाव येते ते पूजा भट्टचे. २००३ मध्ये ‘पाप’ पासून २०१२ मध्ये ‘जिस्म २’ पर्यंत पूजाने दिग्दर्शक म्हणून चार चित्रपट केले. मात्र आतापर्यंत तिला दिग्दर्शक म्हणून नाव कमावता आलेले नाही. नंदिता दासनेही याच क्षेत्रात नाव मिळविण्याचा प्रयत्न केला होता. अभिनय आणि दिग्दर्शन ही वेगळी बाब आहे. प्रियंका, कंगनाशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूर यांनीदेखील दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. सोनमने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यामुळे सोनम दिग्दर्शन करेल यात शंका नाही. आता कोण या क्षेत्रात आपले नाव कमावेल सध्या सांगता येत नसले तरी यासाठी वाट पाहावी लागेल.