अवाढव्य मानधन घेणे बंद करावे, कारण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 10:01 IST2024-12-16T10:01:06+5:302024-12-16T10:01:06+5:30
सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे करायला हवे. यामुळे गुणवत्ता सुधारेल. जेणेकरून हिंदी तसेच इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांशी किंवा हॉलिवूडपटांशी मराठी चित्रपट स्पर्धा करू शकेल.

अवाढव्य मानधन घेणे बंद करावे, कारण...
शरद केळकर, अभिनेता
मराठी सिनेसृष्टीचा विकास करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. मराठी चित्रपट चांगले असतात; पण थिएटरमध्ये प्रेक्षक येत नसल्याने चांगला गल्ला जमत नाही. यासाठी सिनेमांची संख्या कमी करायला हवी. एक निर्माता येतो आणि चित्रपट बनवतो. सिनेमा विकला न गेल्याने सॅटेलाइट हक्क विकले जातील, अनुदान मिळेल या प्रतीक्षेत असतो. सिनेमासाठी पैसे लागत असल्याने हौसेपोटी सिनेमे बनवता कामा नये.
सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे करायला हवे. यामुळे गुणवत्ता सुधारेल. जेणेकरून हिंदी तसेच इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांशी किंवा हॉलिवूडपटांशी मराठी चित्रपट स्पर्धा करू शकेल. आपल्याजवळ अप्रतिम पटकथा, कलाकार, तंत्रज्ञ आहेत; पण द्रष्टेपणा नाही. प्रेक्षकांजवळ तुमच्यापेक्षा जास्त चांगले पर्याय आहेत. चित्रपट हा नाटकासारखा नसावा. कल्पनेच्या पलीकडल्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जावे. यासाठी बजेट हा मोठा घटक मराठीत आडवा येतो. दोन-तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास बिग बजेट चित्रपट बनू शकतात. त्यामुळे जोखीमही कमी होईल.
९० टक्के चित्रपट ओव्हर बजेट झाल्याने प्रमोशन-मार्केटिंगवर खर्च केला जात नाही. ही सर्वात मोठी चूक आहे.
आजच्या काळात मार्केटिंग आणि प्रमोशन गरजेचे आहे. ‘पुष्पा’सारख्या चित्रपटाची लोक वाट बघत असताना त्याचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले. लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवलाच नाही, तर ते सिनेमागृहात कसे येणार? आज ट्रान्झिट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत जे करत आलो, तेच पुढे करता कामा नये. मराठी इंडस्ट्रीचे जगभर खूप नाव आहे; पण व्यावसायिकदृष्ट्या वाढ होत नाही. वर्षाला येणाऱ्या १०० हून अधिक सिनेमांपैकी ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ असे दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील तर कसे होणार?
यासाठी संपूर्ण नफा किंवा तोटा आपला नाही, या तत्त्वावर एकमेकांसोबत वाटचाल करावी लागेल. कलाकार-तंत्रज्ञांना डील्स द्या. अभिनेत्याने सांगितलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम देऊन त्याला व्यवसायात भागीदारी द्या. कॅमेरामन, दिग्दर्शक, लाइन प्रोड्यूसर, संगीतकार यांच्या बाबतीतही असेच करता येऊ शकेल. मी माझ्या परीने प्रयत्न करतो. माझ्या दोन्ही चित्रपटांची पूर्ण फी घेतली नाही. २० ते ३० टक्केच फी घेतली व उरलेली भागीदारी घेतली. वर्षाला १०-१२ मराठी चित्रपट हिट झाल्यास लोक पैसे लावण्यासाठी पुढे येतील. त्यावेळी तुमच्याकडे स्वातंत्र्य असेल, तेव्हा तुम्ही हक्काने पैसे मागून घ्या. संगीतकार अजय-अतुल मराठी असूनही आपल्या निर्मात्यांना परवडत नाहीत. कारण, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. ते गुणवत्तेचे पैसे आकारत असतील, तर चुकीचे नाही. दोन-तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास तेही परवडू शकतात.
वर्षात दर आठवड्याला दोन चित्रपट आले तर १०४ सिनेमे होतात. यापेक्षा जास्त सिनेमे बनवून काय करणार? कारण, सिनेमागृहे मिळवण्यासाठी हिंदी-दाक्षिणात्य चित्रपट, हॉलिवूडपटांशीही आपली स्पर्धा आहे. सिनेमे वाढले तरी सिनेमागृहे तितकीच आहेत. जास्त सिनेमे बनवायचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचे याला काय अर्थ आहे. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा.