बॉलिवूडचे माचोमॅन विनोद खन्ना यांच्याबद्दल 20 मनोरंजक गोष्टी
By Admin | Updated: April 27, 2017 13:08 IST2017-04-27T12:51:53+5:302017-04-27T13:08:59+5:30
यशाच्या शिखरावर असताना अचानक एक निर्णय घेत विनोद खन्नांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेत करिअरला तिलांजली दिल्याने सर्वांनाच धक्का बसला होता

बॉलिवूडचे माचोमॅन विनोद खन्ना यांच्याबद्दल 20 मनोरंजक गोष्टी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटोही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता.
बॉलिवूडमधील हॅण्डसम हिरो म्हणून ओळखले जाणारे विनोद खन्ना यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांना तोडीला तोड देणारा अभिनेता म्हणून विनोद खन्ना यांची ओळख होती. यशाच्या शिखरावर असताना अचानक एक निर्णय घेत विनोद खन्नांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेत करिअरला तिलांजली दिल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्याबद्दल अशाच काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात.
1) 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावरमध्ये (पाकिस्तान) विनोद खन्ना यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल टेक्सटाईल, केमिकलचे व्यवसायिक होते.
2) विनोद खन्नांना चार भावंडं होती. त्यांना एक भाऊ आणि तीन बहिणी होत्या. फाळणीनंतर विनोद खन्नांचं कुटुंब पाकिस्तानातून मुंबईत येऊन वसलं.
3) विनोद खन्ना लहानपणी खूप लाजरे होते. लहानपणी शिक्षिकेने जबरदस्ती त्यांना नाटकात भाग घेण्यास भाग पाडलं. आणि त्यानंतर त्यांच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.
4) बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असताना विनोद खन्ना यांनी "सोलवा साल" आणि "मुगल-ए-आज़म" चित्रपट पाहिला होता. या चित्रपटांना त्यांना खूप प्रभावित केलं.
5) आपल्या मुलाने चित्रपटात काम करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. त्यांनी यासाठी विरोधही केला. मात्र विनोद खन्ना यांच्या जिद्दीपुढे हार मानत त्यांनी दोन वर्षांचा वेळ दिला. या दोन वर्षात विनोद खन्नांनी चित्रपटक्षेत्रात आपली जागा निर्माण केली.
6) विनोद खन्ना यांना राजेश खन्ना खूप आवडायचे.
7) विनोद खन्ना यांना सुनील दत्त यांनी "मन का मीत" " (1968) चित्रपटातून पहिला ब्रेक दिला. विनोद खन्ना यांना व्हिलनच्या भुमिकेतून लाँच करण्यात आलं. विशेष म्हणजे सुनील दत्त यांनी आपल्या भावाला हिरो म्हणून लाँच करण्यासाठी हा चित्रपट तयार केला होता. पण विनोद खन्ना यांनी बाजी मारली.
8) हिरो म्हणून उदयास येण्याआधी विनोद खन्ना यांनी "आन मिलो सजना", "पूरब और पश्चिम" आणि "सच्चा छूठा" सारख्या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका साकारल्या. गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या "मेरे अपने" (1971) चित्रपटातील भूमिकेची चर्चा झाली आणि नायक म्हणून त्यांचा विचार होऊ लागला.
9) विनोद खन्ना यांनी कधीही मल्टिस्टारर चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला नाही. त्यांनी त्यावेळचे सुपरस्टार अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, सुनील दत्त यांच्यासहित अनेकांसोबत चित्रपट केले.
10) अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हेराफेरी, खून पसीना, अमर अकबर अॅन्थनी, मुकद्दर का सिकंदर सारख्या चित्रपटात दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली. हे चित्रपट सुपरहिट ठरले.
11) यशाच्या शिखरावर असताना 1982 मध्ये विनोद खन्ना यांनी घेतलेल्या निर्णयाने बॉलिवूडला धक्का बसला. विनोद खन्ना यांनी बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या या दुनियेला अलविदा करत आपले आध्यात्मिक गुरु ओशो यांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. ओशोंच्या आश्रमात विनोद खन्ना यांनी माळी ते भांडी धुण्यापासून सर्व कामं केली.
12) विनोद खन्ना यांच्या अचानक जाण्याने पत्नी गितांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना त्यांची मुले आहेत.
13) 1990 मध्ये विनोद खन्ना यांनी कविता यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
14 ) चित्रपटांची ओढ विनोद खन्ना यांना शांत बसू देत नव्हती.1987 मध्ये त्यांनी "इंसाफ" चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलं. चार पाच वर्ष नायक म्हणून अभिनय केल्यानंतर ते चरित्र चित्रपटांकडे वळले.
15) विनोद खन्ना यांनी सलमान खानसोबत अनेक चित्रपट केले आहेत. सलमान त्यांना लकी मानत असे.
16) विनोद खन्ना आपल्यावेळी सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक होते
17) एका मुलाखतीत विनोद खन्ना यांनी सांगितलंही होतं की, आपल्या वेळी ते सर्वात फीट होते. पण त्यावेळी आपली बॉडी दाखवण्याचा ट्रेंड नव्हता.
18) विनोद खन्ना चित्रपटांमध्ये स्टायलिश अभिनेता म्हणून समजले जायचे.
19) विनोद खन्ना यांनी फक्त अभिनेता नाही तर निर्माता आणि राजकारणी म्हणूनही यशस्वी ठरले.
20) 1999 मध्ये विनोद खन्ना यांना चित्रपटातील योगदानासाठी फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.