माझा सगळा वेळ ‘तिच्या’साठीच... - स्वप्निल जोशी

By Admin | Published: July 11, 2016 01:37 AM2016-07-11T01:37:39+5:302016-07-11T01:37:39+5:30

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन २३ मेला झाले. त्याच्या या परीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे. ‘सध्या माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिचा आहे

My time is for her ... - Swapnil Joshi | माझा सगळा वेळ ‘तिच्या’साठीच... - स्वप्निल जोशी

माझा सगळा वेळ ‘तिच्या’साठीच... - स्वप्निल जोशी

googlenewsNext


अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन २३ मेला झाले. त्याच्या या परीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे. ‘सध्या माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिचा आहे,’ असे स्वप्निल सांगतोय. स्वप्निलच्या या परीविषयी त्याच्याकडूनच जाणून घेऊ या...
‘वडील होणे ही भावना किती सुंदर असते, असे मी अनेकांकडून ऐकले होते, पण आज खऱ्या अर्थाने मी हे अनुभवत आहे. आमच्या घरात नव्या सदस्याचे आगमन होणार, असे ज्या वेळी मला आणि लीनाला कळले, त्या दिवसापासूनच आम्ही प्रचंड आनंदित झालो होतो. त्या दिवसापासूनच आम्ही या नव्या सदस्याच्या आगमनाची स्वप्ने पाहू लागलो होतो. हा सदस्य यायच्या आधीच या सदस्याच्या स्वागताची तयारी आम्ही सुरू केली होती. लीनाला दिवस गेलेत, हे मला ज्या वेळी कळले, तेव्हाच माज्या बाळाच्या जन्मानंतर दोन महिने तरी मी काहीही काम करणार नाही, असे मी ठरवले होते.’
मुले मोठी झाली की, ती आपल्या अभ्यासात, आपल्या दैनंदिन गोष्टीत प्रचंड व्यस्त होतात. त्यांनाही आपल्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे बाळ लहान असतानाच त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, असे माझ्या मित्रमैत्रिणी मला नेहमी सांगायचे. त्यांचाच सल्ला ऐकून मी दोन महिने तरी केवळ माझ्या परीलाच द्यायचे, असे ठरवले. तिचा जन्म २३ तारखेला झाला आणि २७ मे रोजी ‘लाल इश्क’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सध्या मी कोणतेही काम करत नाहीये. मी २० जुलैनंतर पुन्हा माझ्या कामांना सुरुवात करणार आहे.
आम्हा दोघांनाही मुलीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे आम्हाला मुलगीच व्हावी, अशी आम्ही दोघेही प्रार्थना करत होतो. माझी मुलगी जन्मली, त्या क्षणी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मी लीनासोबत प्रसूतिगृहातच होतो. बाळाचे या जगात येणे, त्यानंतर काही क्षणानंतर तिचे रडणे हे स्वत: मी अनुभवले आहे. तिला पाहिल्यावर मी अक्षरश: रडायला लागलो. मी का रडत आहे, मला काय झाले आहे, हे मला काहीच कळत नव्हते. तिला काही वेळानंतर ज्या वेळी समोर आणले, त्या वेळी ती मस्त शांतपणे झोपली होती. त्या वेळी कुठे मी भानावर आलो. अर्धा तास तरी मी एका वेगळ्याच जगात होतो. त्यानंतर, माझ्या सगळ्या नातलगांना, मित्रांना फोन करून ही गोड बातमी दिली.
गेल्या दोन महिन्यांत मी कोणतेही चित्रीकरण करत नाहीये, तसेच मी कोणत्या मीटिंग्जही ठेवलेल्या नाहीत. मी कुठे बाहेरही जात नाही. माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिच्यासाठी आहे. मी तिच्यासोबत खेळतो, तिला भरवतो, तिची सू-शीही काढतो. तिची नॅपी बदलतो. एवढेच नव्हे, तर मी तिला अंघोळही घालतो. मला या सगळ्या गोष्टी आता चांगल्याच जमायला लागल्या आहेत. या गोष्टी कोणी शिकवायला लागत नाहीत. एकदा बाळ झाले की, माणूस आपोआप सगळे शिकतो, असे मला वाटते. पहाटे तीन ते सकाळी सात हा वेळ तिला बहुधा अतिशय आवडतो. कारण त्या वेळात ती एक मिनीटसुद्धा झोपत नाही. त्यामुळे मी आणि लीना दोघेही या वेळात जागे राहतो. मी, लीना आणि आई-बाबांनी तिला सांभाळण्याचा वेळ वाटून घेतला आहे. ती सकाळी सात-आठच्या सुमारास झोपली की, आम्ही दोघेही झोपतो. मग ती उठल्यावर माझे आई-बाबा थोडा वेळ तिला सांभाळतात. तोपर्यंत आम्ही आमची झोप पूर्ण करतो.
आमच्या या परीचे आम्ही नुकतेच बारसे केले आहे आणि तिचे नाव ‘मायरा’ असे ठेवले आहे. मी आणि लीना दोघांनी मिळून हे नाव ठरवले आहे. मायराचा अर्थ कवीची कल्पना, विलक्षण, कौतुकास पात्र असा होतो. मी १०-१५ दिवसांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. चित्रीकरण सुरू झाल्यावर सुरुवातीचे १० दिवस तरी चित्रीकरण मुंबईतच असणार आहे. त्यामुळे मी रात्री तिला भेटू शकेन, पण त्यानंतर मी मुंबईच्या बाहेर जाणार आहे. या दरम्यान, लीना तिच्या माहेरी औरंगाबादला जाणार आहे. या वेळात मी माझ्या ‘मायरा’ला खूप मिस करणार, हे मला चांगलेच माहीत आहे.
मला रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जाते, पण तरीही आज मी मायरावर जितके प्रेम करत आहे, तितके प्रेम ना कधी कोणावर केले आहे नि कोणावर करू शकतो. ‘मुलीचा बाबा’ होण्याची भावनाच वेगळी असते.
शब्दांकन : प्राजक्ता चिटणीस

Web Title: My time is for her ... - Swapnil Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.