Ajay Devgan is responsible for being single, Tabu | मी अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार- तब्बू
मी अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार- तब्बू

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने स्वतःच्या आयुष्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. तब्बूनं अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केलंय. मात्र तब्बूचा विजयपथ हा सिनेमा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. 1994मध्ये विजयपथ या चित्रपटात तिने अजय देवगणसोबत अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तब्बू आणि अजयची जोडी त्या काळातही प्रेक्षकांना प्रचंड भावली.

तब्बू एका मुलाखतीत म्हणाली, मी आणि अजय आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. तसेच त्यावेळी तो माझा खूप चांगला मित्रसुद्धा होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे माझ्यासोबत असायचे. प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर यायचे. माझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली आहे.

तब्बू आणि अजयने हकीकत, तक्षक, फितूर आणि दृश्यम यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. तसेच ते दोघे गोलमाल 4 या चित्रपटातही पाहायला मिळतील. गोलमाल 4 या चित्रपटात अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, कुणाल खेमू आणि तुषार कपूर हे भूमिका साकारणार आहेत. तब्बूच्या या खुलाश्यानंतर चित्रपटसृष्टीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत. 80 ते 90च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 1980मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवले.


Web Title: Ajay Devgan is responsible for being single, Tabu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.