जे जिंकतील ते आमचेच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:54 IST2025-12-31T11:53:38+5:302025-12-31T11:54:15+5:30
भाजपला जेथे मित्रांना आपल्या फायद्याकरिता वापरायचे आहे तेथे वापरले. पण आपला वापर करू दिला नाही. मंगळवारी दिवसभर वेगवेगळ्या शहरांमधील नाराजांचे भोकाडे, आत्मदहनाचे इशारे, आरोप यांचा सिलसिला सुरू राहिला. काही ठिकाणी राडे झाले. आता बंडखोरांना थंड करण्याच्या सर्व क्लृप्त्या केल्या जातील. त्यानंतर जे लढतील आणि त्यातील जे विजयी होतील ते ‘विकासा’च्या ध्यासापोटी सत्ताधाऱ्यांसोबत जातील.

जे जिंकतील ते आमचेच!
खेळ कुठलाही असला तरी सोंगट्या आपल्या मनमर्जीनुसार हलवण्याची संधी ज्याला मिळते तोच त्या खेळावर आपली हुकूमत गाजवतो. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाल्याने सर्वाधिक आमदार निवडून आणूनही भाजपने ती संधी गमावली होती. शिवसेनेत मोठी फूट पाडून व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही भगदाड पाडून आपल्या मनमर्जीनुसार सोंगट्या हलवण्याची गमावलेली संधी भाजपने पुन्हा खेचून आणली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी जोरदार झटका दिला. त्यामुळे जेमतेम सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सोंगट्या हलवण्याची आपली खुर्ची निसटणार, अशी भीती भाजपला वाटू लागली. मात्र, लाडकी बहीणसारख्या योजनांपासून टोलमाफीपर्यंत अनेक लोकानुनयी योजनांचा मारा करून व विकासाभिमुख निर्णयांचा अक्षरश: पाऊस पाडून भाजपने आपले स्थान राखले.
पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारी व विरोधी पक्षाची सत्त्वपरीक्षा असलेल्या महापालिका निवडणुका सध्या होत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात नागरीकरण झपाट्याने झाल्याने महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या योजनांकरिता केंद्राकडून मोठा निधी येत असल्याने येथील सत्ताकारणावर कब्जा करणे ही सर्वच पक्षांची गरज आहे. एकेकाळी जेव्हा महाराष्ट्रात दोन काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांची युती यांचे संसार चालायचे तेव्हाही भांड्याला भांडे लागत असे. आता महाराष्ट्रात दोन शिवसेना, एक मनसे, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असे प्रमुख पक्ष असल्याने व ते महायुती अथवा महाविकास आघाडीत वाटले गेल्याने वनरूम किचनच्या फ्लॅटमध्ये एखाद्याचा पाय दुसऱ्याला लागण्यामुळे तंटेबखेडे होणार तसे अगोदरच सुरू होते. त्यातच ‘विकासा’चा ध्यास घेतलेल्या अनेकांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलच्या डब्यात कमी वाटेल इतकी गर्दी या पक्षांत झाली.
महापालिकेकरिता मुंबई वगळता इतरत्र बहुसदस्यीय प्रभागपद्धती स्वीकारल्यामुळे एक (पैसा व मनगटाने) मातब्बर नेता पक्षात घ्यायचा व त्याच्यावर अन्य दोघांना किंवा तिघांना विजयी करण्याची जबाबदारी सोपवायची, असे निवडणुकीचे गणित तयार झाले. साहजिकच, हा नेता अशा चालून आलेल्या संधीचे सोने करून आपली पत्नी, मुलगा, सून, भाऊ यांनाही ‘विकासा’च्या वाटेवर हात धरून नेतो. यामुळे काही पक्षांत एकेका वॉर्डात इच्छुकांची संख्या ही १५ ते २५ झाली. मुलाखतींचे सोपस्कार पार पाडण्यापूर्वीच बहुतेक पक्षातील बहुतांश जागांवर कुणाला उमेदवारी द्यायची हे जवळपास सर्व पक्षांनी निश्चित केले होते. मात्र, भाजपने या निवडणुकीतही सोंगट्या फेकण्याची पहिली व शेवटची संधी आपल्यालाच मिळावी याकरिता महायुतीच्या वाटाघाटी सुरू केल्या. अगोदर सर्वांनीच स्वबळाचे नारे दिलेले असल्याने इच्छुक कावरेबावरे झाले.
कुठे दहा जागांवर अडले, तर कुठे दोन जागांचा पेच आहे, अशा बातम्या माध्यमांना यथेच्छ पुरवून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मित्रपक्ष, विरोधक आणि माध्यमकर्मी यांना खेळवले गेले. अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी न मिळाल्यामुळे कागदपत्रे तयार करून बंड करणे अनेकांना अशक्य होते. त्यामुळे हे चर्चेचे गुऱ्हाळ लांबवले गेले. मोजके अपवाद वगळता बहुतांश महापालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढत आहे. त्यामुळे समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या सक्षम उमेदवाराला बंड करायचेच असेल तर त्याने उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा पर्याय न निवडता ‘विकासा’करिता अजित पवार यांच्यासोबत जावे ही सोंगटी देखील भाजपनेच फेकलेली. नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी परस्परांवर फैरी झाडून विरोधकांचे अवकाश व्यापून टाकले.
महायुतीचे जास्तीतजास्त नगराध्यक्ष विजयी केले. त्यातही भाजपने आपला अव्वल क्रमांक राखला. मोजक्याच महापालिका निवडणुकांत थोड्या जागांची खिरापत शिंदेसेनेच्या हातावर ठेवून युती केल्याचा देखावा निर्माण केला. जेथे भाजप मजबूत आहे तेथे शिंदेसेनेचीही अजित पवार यांच्या पक्षासारखीच बोळवण केली. तात्पर्य हेच की, भाजपला जेथे मित्रांना आपल्या फायद्याकरिता वापरायचे आहे तेथे वापरले. पण आपला वापर करू दिला नाही. मंगळवारी दिवसभर वेगवेगळ्या शहरांमधील नाराजांचे भोकाडे, आत्मदहनाचे इशारे, आरोप यांचा सिलसिला सुरू राहिला. काही ठिकाणी राडे झाले. आता बंडखोरांना थंड करण्याच्या सर्व क्लृप्त्या केल्या जातील. त्यानंतर जे लढतील आणि त्यातील जे विजयी होतील ते ‘विकासा’च्या ध्यासापोटी सत्ताधाऱ्यांसोबत जातील.