पवार V/s पवार

By सचिन जवळकोटे | Published: April 7, 2019 09:06 AM2019-04-07T09:06:52+5:302019-04-07T09:07:01+5:30

ना हाफ चड्डी ना संघ दक्ष.. तरीही ‘कमळा’साठी बारामतीकरांच्याच सरदारांमध्ये संघर्ष !

Pawar V / s Pawar | पवार V/s पवार

पवार V/s पवार

googlenewsNext

 

 

- सचिन जवळकोटे

 आपली ‘शिंदेशाही’ टिकविण्यासाठी दोन नेत्यांचा चाललाय कडवा संघर्ष. हीच ‘शिंदेशाही’ संपविण्यासाठी त्यांचे कैक दुश्मन एकत्र येऊन करताहेत जीवघेणा हल्ला. खरंतर, ही घनघोर लढाई मूळच्या ‘आघाडी’मधल्या नेत्यांचीच. कधीकाळी बारामतीकरांच्या तालमीत तयार झालेल्या मल्लांचीच. ‘हातात घड्याळ’ बांधून पंधरा वर्षे संसार थाटलेल्या आप्तस्वकियांचीच.. कारण या मंडळींना ना कधी हाफ चड्डी घातलेली की ना कधी ‘संघ दक्ष’चा नारा दिलेला. 

कमळ’ फक्त नावालाच...

 माढा मतदारसंघातील ओसाड माळरानावर गावोगावच्या मंडळींनी आजपावेतो भलेही ऊस पिकविलेला. वाहत्या कॅनॉलमध्ये ‘हात’ धुऊन घेतलेला; मात्र साचलेल्या पाण्याचा तलाव यांनी आयुष्यात कधी बघितलाच नाही. पर्यायानं सरोवरातली ‘कमळं’ कसली असतात, याचा अनुभव घेणं तर स्वप्नातीत गोष्ट. अशा परिस्थितीत जेव्हा यंदा ‘कमळाचा गवगवा’ होऊ लागला, तेव्हा अनेकांचे विस्फारले गेले डोळे. गरागरा फिरली नजर.

 ...परंतु आतली मेख वेगळीच. ‘कमळ’ फुलत असतं चिखलात. राडा रोड्यातच.. म्हणूनच की काय ‘आघाडी’ची कैक मंडळी रमली राजकीय ‘राडा’ करण्यात. प्रतिस्पर्धी मल्लांच्या पाठीला माती लावायची असेल, तर नुसते ‘हात’ चालवून नाही चालत. पायात पाय घालून पाडायचीही ठेवावी लागते तयारी... हे ज्यांच्याकडून शिकण्यात यांची सारी जिंदगानी गेली, त्या थोरले काका बारामतीकरांचेच हे सारे शिष्य. गुरूचाच डाव गुरूवर उलटायला टपून बसलेले पट्टशिष्य.

1) गेली वीस वर्षे ‘थोरले दादा अकलूजकर’ यांनी आपली ‘स्वामीनिष्ठा’ पूर्णपणे ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्यासोबत जपलेली.. मात्र, याचवेळी ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांची ‘वक्री नजर’ही वेळोवेळी त्यांच्या जिव्हारी लागलेली. त्यातूनच अकलूजकर पिता-पुत्रांनी सूड घेण्यासाठी आता ‘संजयमामांची पाठ’ निवडलेली. यामागंही लपलंय एक गूढ समीकरण. ‘वार माढ्याच्या मामांवर’ होणार असला तरी ‘जखमा बारामतीच्या काकांना’ होणार, हे ठावूक झाल्यानंच अकलूजकरांनी घडविलंय हे ‘आप्तस्वकियांचं महाभारत.’ 

2) पंढरपूरचे ‘प्रशांत मालक’ हेही एकेकाळचे बारामतीकरांचे चेले. दहा वर्षांपूर्वी पंढरपुरात थोरल्या पंतांचं तिकीट कापल्यावर अकलूजकरांच्या विरोधात उभा दावा मांडला गेला. गेली दहा वर्षे हे वैरत्व बारामतीकरही अत्यंत तटस्थपणे अन् मोठ्या ‘कौतुकानं एन्जॉय’ करत होते; परंतु अखेर थोरल्या काकांवरच ‘पंढरपूरचं बुमरँग’  उलटलं. खरं तर शत्रूचा शत्रू मित्र ठरतो; परंतु इथं अकलूजकरांचा नवा शत्रू पंतांसाठीही शत्रूच ठरला. या साºया प्रवासात ‘कमळ’ नावाचा शब्द चुकून तरी कुठं आला होता का?

3) माण-खटावचे ‘जयाभाव’ हेही बारामतीकरांचे कट्टर शत्रू. थोरले काका हे केवळ ‘हात’वाल्यांचे सत्तेत पार्टनर होऊ शकतात, जिगरी मित्र नाही.. याचा  महाराष्टÑात पहिला साक्षात्कार म्हणे ‘जयाभाव’नाच आलेला. त्यामुळं ‘आघाडी’त असूनही ते सध्या माढ्यात गावोगावी घेताहेत बैठका ‘फलटणच्या रणजितदादां’साठी. अकलूजच्या ‘शिवरत्न’वरही ‘दादां’सोबत झालेल्या ‘डिनर’वेळी प्लॅन आखला गेला.. ‘मामाच्या गावालाऽऽ जाऊ याऽऽ’ मोहिमेचा. इथंही कुठं ‘कमळ’ नाही रावऽऽ.


दोन्ही शिंदे थोरल्या काकांचे लाडके

1) ज्यांनी खुद्द ‘हातात कमळ’ घेतलंय, ते ‘फलटणचे रणजितदादा’ही मूळचे ‘हात’वालेच. त्यांच्या पित्यांपासून बारामतीकरांसोबतची जुनी दुश्मनी. फलटणमधला ‘रामराजेंचा राजकीय दरारा’ मोडून काढण्यात याच निंबाळकर पिता-पुत्रांनी निम्मं आयुष्य खर्ची घातलेलं. खुद्द ‘रणजितदादा’च म्हणतात, ‘माझी लढाई बारामतीकरांशीच, संजयमामा कोण?’ विशेष म्हणजे, हे ‘संजयमामा’ जरी कमळाच्या पुढाकारातून झेडपीच्या गाडीत बसले असले तरी त्यांनीही प्रत्यक्षात कधी हातात कमळ धरलेलं नव्हतंच.

2) सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, शेटफळचे विजयराज अन् पंढरपूरचे कल्याणराव हीही सारी मंडळी पूर्वी बारामतीकरांच्या राजकारणाशीच जोडली गेलेली.

3) ‘लक्ष्मणराव वाघोलीकर’ही बारामतीकरांचेच चेले. थोरल्या काकांसोबत सत्तेत असेपर्यंत यांची वाणी पोपटावानी होती; मात्र अलीकडच्या काळात लालभडक मिरची खाल्ल्यासारखी अधिकच जहाल बनली. त्यांनी कालच दोन्ही ‘शिंदें’विरोधात जबरदस्त ‘पोपटपंची’ केलेली अनेकांना झोंबली. ( ‘पोपटपंची’ हा अस्सल शब्द अनगरच्या वाड्यावरचा बरं का !) असो. सांगायचा मुद्दा हा की ‘दोन शिंदेंविरोधात ढोबळे’ या वादातही ‘कमळ’ कुठंच नाही बरं का. केवळ हे ‘दोन्ही शिंदे थोरल्या बारामतीकरांचे लाडके’ म्हणूनच अवघ्या जिल्ह््यात हा सारा त्रागा.

जाता-जाता 

महाराजांची ‘वाणी’

‘पोपटाच्या वाणी’वरनं गौडगावचे महाराज आठवले. खरंतर, सोलापूरचे ‘विजूमालक’ या महाराजांच्या ‘वाणी’चा फायदा घेण्यासाठी आसुसलेले. पूर्वीचे खासदार ‘मौनी’ होते. त्यामुळं हे नवे महाराज आता नेहमीच ‘मौन’व्रत सोडून छान-छान बोलतील, अशी विजूमालकांच्या वाड्यावर अपेक्षा; मात्र त्यांनी तोंड उघडताच जी भलतीच ‘वाणी’ प्रकटली, ते ऐकून दक्षिण-उत्तर कसब्यातल्या कट्टर ‘कमळ’वाल्यांनाही क्षणभर ‘देव’ आठवला.

- सचिन जवळकोटे

( लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत. )

Web Title: Pawar V / s Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.