पवार कुटुंबातील धाकली पाती

By यदू जोशी | Published: April 2, 2024 12:20 PM2024-04-02T12:20:17+5:302024-04-02T12:21:04+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी दिलेल्या निधीने अनेकांना उपकृत केले. अनेकांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते आणि नेते होते अजित पवार.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar, Dhakli Pati of Pawar family | पवार कुटुंबातील धाकली पाती

पवार कुटुंबातील धाकली पाती

 - यदु जोशी
आपल्या राजकीय आयुष्यात कधी घेरले गेले नसतील इतके सध्या अजित पवार घेरले गेले आहेत. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शरद पवारांचे मोठे आव्हान समोर उभे आहे. पत्नी सुनेत्रा बारामतीतून लढत आहेत अन् समोर आहेत सुप्रिया सुळे. काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी दिलेल्या निधीने अनेकांना उपकृत केले. अनेकांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते आणि नेते होते अजित पवार.

पहिले बंड, सकाळीच फडणवीसांबरोबर घेतलेली ती शपथ अन् मग दोनच दिवसात घेतलेली माघार... प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही विशिष्ट दिवस असतात की ते आठवावेसे वाटत नाहीत, बंडाचे ते दोन-तीन दिवस अजित पवारांसाठी तसेच असतील. २०१९ मध्ये योग जुळून आला; पण टिकला नाही मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडाने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवले. तसे या पक्षाला आणि पक्षातील सरदारांना सत्तेशिवाय राहणे जरा कठीणच जाते. आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. शरद पवार यांनी या सरदारांची मोट बांधली, आता अजितदादांनी तो वारसा चालविला आहे. बहुतेक सरदारांना भाजपसोबत जाणे वावगे वाटले नाही आणि भाजपनेही त्यांना पवित्र करून घेतले. शिंदे-फडणवीसांच्या साथीने अजितदादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली. एक पाडाव तर त्यांनी पार केला; पण खरी आव्हाने अजून बाकी आहेत. 

काकांनी जन्माला घातलेला पक्ष पळविला अन् त्याची मालकी स्वत:कडे घेतली; पण स्वत:चे काय? हे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे आणि त्यासाठीच्या दोन परीक्षा आता येऊ घातल्या आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेची निवडणूक त्यांची परीक्षा पाहील. महायुतीत आपल्या वाट्याला आलेल्यांपैकी लोकसभेच्या किती जागा ते जिंकून आणून दाखवतात हे तर महत्त्वाचे असेलच; पण सर्वात महत्त्वाचे असेल ते हे की बारामतीचा गड कोण राखणार? गड आला; पण सिंह गेला असे होता कामा नये याची दक्षता घ्यावी लागेल. बारामतीच्या निकालाने एकाचवेळी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. पवारांच्या कुटुंबातील संघर्षात बारामतीकर जनता कोणासोबत आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक असेल. विजय शिवतारेंची समजूत काढणे, हर्षवर्धन पाटलांची मनधरणी, महादेव जानकर यांना परभणीत आपल्या कोट्यातून जागा देऊन बारामतीतील धनगर समाजाची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असे सगळे उपाय ते करत आहेतच. राजकीय डावपेच  आणि भावनिक राजकारण या दोन्हींमध्ये ते शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यावर कशी मात करतात यातच त्यांचा
कस लागेल. 

इथे कोणाशी तुलना करायची नाही; पण अजितदादांना छक्केपंजे कळत नाहीत, ओठात एक पोटात दुसरेच हेही त्यांना नाही जमत.  स्पष्टवक्ते आहेत, वक्तशीरपणा हा त्यांचा आणखी एक गुण. शब्दाचे पक्के, प्रचंड स्टॅमिना, प्रशासनाचा गाढा अभ्यास, गुणग्राहकता हे गुणही आहेतच. या सगळ्या गुणांच्या सोबतीने ते बारामतीची अन् अन्य जागांची लढाई जिंकतात का यावर खूप काही अवलंबून असेल.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar, Dhakli Pati of Pawar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.