The light of Lord Shiva's car .. .. strong wind in the lobby! | महाराजांच्या गाडीला लाल दिवा.. ..भगव्या लॉबीत जोरदार हवा !
महाराजांच्या गाडीला लाल दिवा.. ..भगव्या लॉबीत जोरदार हवा !

- सचिन जवळकोटे

‘मठात प्रवचन झाडणारा साधू कुठं खासदार होऊ शकतो काय?’ असं दोन महिन्यांपूर्वी कुत्सितपणे विचारणारे आज पुरते चिडीचूप झालेत. मात्र केवळ याच मंडळींसाठी नव्हे, तर गौडगाव महाराजांना दिल्लीला पाठविण्यात सिंहाचा वाटा असणा-यांसाठीही एक ब्रेकिंग न्यूज. खासदारकी मिळविल्यानंतर हे महाराज आता खेचून आणू शकतात ‘लाल बत्ती’ची गाडी. त्यासाठी लागलीय थेट उत्तर प्रदेशातील साधूंच्या भगव्या लॉबीकडून जबरदस्त फिल्डिंग. यल्ली इद्दीरीऽऽ सुम्म नोडरीऽऽ.

सोलापूर मतदारसंघ राखीव. त्यामुळं या ठिकाणी उभारण्याचा अधिकृत पास गौडगावच्या मठात सापडल्यानंतर ‘उत्तर’च्या ‘विजयमालकां’ना जणू सत्तेची चावी सापडली. आयुष्यभर प्रवचनात रमलेली व्यक्ती राजकारणातल्या छक्क्या-पंज्यांपासून दूर. त्यामुळंं ती कायमची केवळ आपल्या(च) ताब्यात राहील, हा ‘विजूमालकां’चा होरा.. म्हणून त्यांनी महाराजांना केलं उभं. आणलं निवडून. मात्र महाराज पडले संतवचनी. ‘सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहावं’ हीच शिकवण त्यांनी आयुष्यभर भक्तांना दिलेली. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनीही स्वत: प्रत्यक्षात आणली. त्यांची विचारधारा ‘विजूमालकां’इतकीच ‘सुभाषबापूं’सोबतही जुळली. थेट मुंबईच्या देवेंद्रपंतांसोबतही हॉटलाईन जोडली. हे कमी पडलं की काय म्हणून कर्नाटकातील महाराजांकडून उत्तर प्रदेशच्या संत-महंतांशीही संवाद साधला गेला. तिथली ‘भगवी लॉबी’ तर ‘अमितभार्इं’च्या खास वर्तुळातली. मर्जीतली. त्यामुळं आता नव्या मंत्रिमंडळात सोलापूरची वर्णी लागली, तर तो नक्कीच समजू नये योगायोग. गौडगावच्या मठासमोर लाल दिव्याची गाडी येऊन कच्च्ऽऽकन थांबली तर तो नक्कीच समजू नये चमत्कार. कारण संतवचनातच सांगितलंय ना, ‘सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहावं,’.. विजूअण्णा.. होली बिडरीऽऽ.. सुम्म कुंडरी.

सुशीलकुमारांचा सोलापूरशी ऋणानुबंध तसा खूप जुना. अनेक दशकांचा. ते मुंबईहून ‘सिद्धेश्वर’नं निघाले की, इकडं सोलापुरात कार्यकर्ते पहाटेचा अलार्म लावून झोपायचे. सकाळी हार-तुरे घेऊन स्टेशनवर स्वागताला थांबायचे. हे खरं तर त्यांच्यावरील प्रेमापोटी-श्रद्धेपोटी घडायचं. काळानुरूप ही जणू परंपराच बनली. बुके देणारे ‘गुडबुक’मध्ये गेले. ‘अ‍ॅन्टी चेंबर’मध्ये बसू लागले. प्रामाणिकपणे काम करणारे मात्र बंगल्याबाहेरच थांबले.


इथंच घात झाला. बाहेर काय सत्य परिस्थिती आहे, हे वास्तव सांगण्याऐवजी केवळ ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ म्हणणा-यांचीच चलती झाली. एखाद्या कार्यकर्त्याला जवळ केलं तर त्याचा अख्खा समाजच आपल्या पाठीशी राहतो, असं भ्रामक वातावरण निर्माण केलं गेलं. गल्लीत जनाधार नसलेली मंडळी त्यांच्यासोबत गाडीत बसून दिल्लीच्या बाता मारू लागली. याबाबत सखोल चर्चाच करायची असेल, तर ‘चेतनभाऊ-प्रकाशअण्णा’ या जोडीशी साधू शकता संपर्क.

एकतर काही ‘हात’वाल्यांंना अगोदरच आयुष्यभर सत्तेची चटक लागलेली. अशात पाच वर्षे उपवास घडलेला. नैराश्येतून आत्मविश्वास गमावलेला. त्यात पुन्हा ‘समोरचे महाराज म्हणजे किस झाड की पत्ती?’ असा फाजील विश्वास बाळगला गेलेला. यामुळे पक्षासाठी जीव तोडून काम करणारी मंडळी दूर राहू लागली. सर्वांत कहर म्हणजे, काही नेत्यांना लोकसभेपेक्षाही स्वत:च्या विधानसभेचीच चिंता लागलेली. त्यापायी या काळात पंढरपुरात काहींनी बेताल वक्तव्यं केली, तर काहींनी अक्कलकोटात विरोधकांबद्दल ‘ब्र’ शब्दही न काढलेला. या वातावरणात पक्षाच्या विजयापेक्षा नेत्याची मर्जी महत्त्वाची ठरली. केवळ त्यांच्या सभांपुरतं पुढं-पुढं करणारी मंडळी नंतर प्रत्यक्षात कसला प्रचार करत होती, याचं उत्तर निकालाच्या आकड्यांमध्येच लपलेलं. असो.

माढ्यात मतदान झाल्यानंतर ‘संजयमामां’च्या टीमनं बरेच तास बसून आकडेमोड केली. कारखान्यात बसून ‘जमदाडें’च्या मोबाईलमध्ये म्हणे कॅलक्युलेशनही झालेलं. ‘तब्बल ५५ हजारांनी मामा येणार’ असा परफेक्ट आकडाही अखेर बाहेर फुटलेला. कारखान्याचा पट्टा अन् निवडणुकीची पट्टी यात जमीन-अस्मानाचा फरक असतो, हे भलेही ‘जमदाडें’च्या लक्षात आलं नसलं तरी निकाल काय लागणार, हे ब-याच जणांना अगोदरच समजलेलं. ज्या माढ्याच्या जीवावर अवघ्या जिल्ह्यात धुमाकूळ घालत निमगावचा अश्वमेध निघालेला, तो इथल्याच सीमेवर अडखळला. ‘मामां’च्या माढा विधानसभेत घड्याळाला अवघा साडे सहा हजार लीड मिळाला. बिच्चा-या ‘बबनदादां’ना काय वाटलं असेल? पंचवीस वर्षे टिकवून ठेवलेल्या साम्राज्याची धाकट्या भावाच्या युद्धात पुरती वाट लागली. विरोधक मंडळी निव्वळ ‘संजयमामां’ना पाडायला पुढं सरसावली होती की अवघ्या शिंदे घराण्याचं राजकारणच संपवायला टपून बसली होती ? आता याचं उत्तर काळच देणार... म्हणजे पुढच्या सहा महिन्यांत विधानसभेला कळणार. तोपर्यंत चालू द्या आपली ‘लगाव बत्ती’. 

 गेल्या निवडणुकीत ‘थोरले दादा अकलूजकर’ निवडून आल्यानंतरही जेवढा जल्लोष केला गेला नसेल, तेवढा काल ‘शिवरत्न’वर गुलाल उधळला गेला. पडणार ‘निमगावकर’.. निवडून येणार ‘फलटणकर’; परंतु जणू दिवाळी साजरी करणार ‘अकलूजकर’. खरंतर, फलटणकरांच्या विजयाचं यांना सुख ना दु:ख. आनंद फक्त ‘शिंदेशाही’च्या पाडावाचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खूप मोठी सत्वपरीक्षा होती दोन्ही दादांसाठी. ‘माढ्यात कुणालाही तिकीट द्या; एक लाखाच्या लीडनं निवडून आणतो,’ हा देवेंद्रपंतांना दिलेला शब्द अखेर पिता-पुत्रांनी खरा करून दाखविला. आता पाहिजे ती पदं त्यांना मिळतील. जिल्हाभर पुन्हा साम्राज्य निर्माण करता येईल. त्यात पुन्हा त्यांच्या डबघाईला आलेल्या संस्थांना हातभार लागला, तर ‘शिवामृत’च्या दुधात ‘सहकार महर्षी’ची साखरच की हो. (क्रमश:)

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)


Web Title: The light of Lord Shiva's car .. .. strong wind in the lobby!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.