संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:41 IST2025-12-27T07:39:42+5:302025-12-27T07:41:55+5:30
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच जोडाजोडी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असला, तरी भाजपने नाशिकमध्ये जे केले ते क्लेशदायीच नव्हे, तर संतापजनकही ठरते.

संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
भाजपचे सर्वप्रिय नेतृत्व म्हणवल्या जाणाऱ्या स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच नाशिकमध्ये भाजपने तत्वनिष्ठेचे बोचके गोदावरीच्या पाण्यात भिरकावले. सत्तेच्या मदांधतेत आणि विजयाच्या कैफात स्वपक्षीय निष्ठावंत कार्यकर्त्यांना, तसेच मतदारांनाही गृहीत धरण्याचे पातक भाजपचे संकटमोचक म्हणवल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडून घडले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संतापून महाजनांना धारेवर धरले, तरी कशाकशाला न जुमानता त्यांनी विरोधातील सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना पावन करून भाजपमध्ये घेतलेच. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच जोडाजोडी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असला, तरी भाजपने नाशिकमध्ये जे केले ते क्लेशदायीच नव्हे, तर संतापजनकही ठरते.
विरोधी आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) या चार पक्षांमधील दोन माजी महापौर, स्थायी समितीचे दोन माजी सभापती, एक माजी आमदार व अन्य माजी नगरसेवक अशांचा घाऊक पक्ष-प्रवेश घडवण्यात आला. भाजपच्या नाशिक निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांच्यासह बहुतांश नेत्यांना अंधारात ठेवून हा प्रवेश सोहळा एका रात्रीत ठरवला गेला. भाजपच्या निष्ठावंत निवडणूक इच्छुकांमध्ये, तसेच स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली. फरांदे यांच्यासह बरेच निष्ठावंत नेते-कार्यकर्ते संतापून रस्त्यावर उतरले. गिरीश महाजन यांना भाजप कार्यालयाबाहेरच घेराव घालून कार्यकर्ते जाब विचारताहेत, असे अभूतपूर्व चित्र पाहावयास मिळाले. कार्यकर्त्यांचा विरोध इतका तीव्र होता की, नव्याने पक्षात येणाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात आणि चक्क मागच्या दरवाजाने भाजप कार्यालयात आणावे लागले. हा सगळा विरोध अक्षरश: फाट्यावर मारत महाजनांनी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या आयारामांच्या गळ्यात कमळ चिन्हाची उपरणी घातलीच ! काँग्रेसचे शाहू खैरे यांचा अपवाद वगळता इतर साऱ्यांनी आपापल्या स्वार्थासाठी किमान तीन-चार पक्षांतरे केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजपचा त्याग करून मनसेत जावून निवडणूक लढलेले आणि त्यानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस बनलेले दिनकर पाटील तसेच उद्धवसेनेचे नेते, माजी महापौर विनायक पांडे हे दोघे तर आदल्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र आल्याबद्दल एकमेकांना पेढे भरवत ढोल-ताशांच्या गजरात रस्त्यावर नाचले होते. चोवीस तासांत हे दोघे बिनदिक्कतपणे भाजपमध्ये दाखल झाले. हे असे आपण का केले, याचे कसलेही गुळमुळीत खुलासे न देता ‘आपण पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी भाजपत येत आहोत’, असे अगदी रोखठोक उत्तर उभयतांनी माध्यमांसमोर दिले.
माजी आमदार नितीन भोसले आणि माजी महापौर यतिन वाघ हे देखील राजकीय सोयीसाठीच भाजपच्या वळचणीला आले आहेत. भाजपने सुद्धा विरोधी आघाडीतील सक्षम नेत्यांना आणि प्रस्थापितांना आपल्याकडे खेचून विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत, असा गुजरात पॅटर्न नाशिकमध्ये राबविला. गिरीश महाजन या प्रयोगाचे कर्तेधर्ते आणि त्यांचाही याबद्दल एक जळगाव पॅटर्न आहेच. त्यामुळे निष्ठावंतांचा वर्ग कमालीचा दुखावला गेला आहे. तसेही नाशिक अपवाद नाही. चंद्रपूर म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत ‘आतले विरुद्ध बाहेरचे’ असा वाद भाजपमध्ये उफाळला आहे. ही घाऊक भरती म्हणजे वास्तवात बाळसे नसून, सूज आहे. संधीसाधू राजकारणासाठी भाजपला आपलेसे करणाऱ्या मंडळींच्या निष्ठा एवढ्या निसरड्या असतात की, वेळ येताच भाजपला टांग देण्यास ही मंडळी जराही मागेपुढे पाहणार नाहीत. पण, सत्तातूर भाजपला त्याची काहीही फिकीर नाही. नाशकात गिरीश महाजनांनी ज्या आविर्भावात हे सारे केले, त्यातून पक्ष कार्यकर्त्यांसह लोकांना गृहीत धरण्याची मनोवृत्ती आणि सत्तेचा मद उघडपणे पाझरताना दिसतो. निवडणूक जिंकण्याची झिंग चढलेला भाजप त्या नादात जरी निष्ठा, नैतिकता याकडे डोळेझाक करत असला, तरी सामान्य मतदार उघड्या डोळ्याने हे सारे पाहतो आहे. वेळ येताच आणि समोर जरा बरा पर्याय दिसताच सत्तेची धुंदी उतरवायला मतदार मागेपुढे पाहणार नाही. महाजनांची दांडगाई केवळ पक्षप्रवेशावेळीच दिसली असे नाही. आधी तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर अशीच मुजोरी महाजनांनी दाखविली. परिणामी, सरकारवर प्रचंड टीका झाली. नाशिककर रस्त्यावर उतरले. त्यातून धडा शिकण्याऐवजी महाजनांनी आता थेट आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते अंगावर घेतले आहेत. झाडांवर कुऱ्हाड उगारलीच, तशी निष्ठेवरही ! संकटमोचक कसले, ते पक्ष व सरकारपुढे एकामागून रोज नवे संकट उभे करीत आहेत. त्याचा परिणाम लगेच दिसला नाही, तरी कधी ना कधी दिसेलच.
