शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:27 IST2026-01-14T20:25:12+5:302026-01-14T20:27:06+5:30
महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान काही तासांवर असताना धुळ्यात प्रचंड राडा झाला. शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक करण्यात आली.

शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
धुळे महापालिका निवडणुकीसाठी उद्या (१५ जानेवारी) मतदान होत आहे. त्याआधीच शहरात एक गालबोट लावणारी घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले. धुळ्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली.
धुळ्यातील प्रभाग क्रमांक २ मधील शिंदेसेनेचे उमेदवार ऋषिकेश मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. मंगळवारी म्हणजे प्रचार थांबला त्या दिवशी (१३ जानेवारी) रात्री ही घटना घडली आहे.
मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी तुफान दगडफेक केली. त्यांच्या घराच्या कांचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. तर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
शिंदेसेनेच्या नेत्याने कुणावर आरोप केले?
मोरे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला, असा आरोप मनोज मोरेंनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांमध्ये भीती पसरवून राजकीय दबावाचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
पोलीस बंदोबस्त वाढवला
या दगडफेकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. घटनास्थळाचा पंचनामा करून दगडफेकीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद करण्यात आली. मनोज मोरे यांनी भाजपाचे विलास शिंदे यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.