महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:12 IST2025-12-30T12:12:24+5:302025-12-30T12:12:55+5:30
बंडखोरीच्या भीतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर न करण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे.

महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
धुळे - महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला असून याठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत युती होणार आहे. सोमवारी रात्रीपर्यंत महायुतीच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिंदेसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शेवटपर्यंत भाजपाने त्यांचे पत्ते खुले केले नसले तरी त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.
बंडखोरीच्या भीतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर न करण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटप निश्चित झाले असून महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. एकूण ७६ जागांपैकी काँग्रेस २५, उद्धवसेना-मनसे ३५ तर शरद पवारांची राष्ट्रवादी १४ जागांवर निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे भाजपाने युतीसंदर्भात काहीच स्पष्ट न केल्याने शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली. महापालिका निवडणुकीत एमआयएम २३ जागांवर उमेदवार उभे करत असून आणखी काही जागांबाबत चर्चा सुरू आहे.
भाजपात यादीपूर्वीच 'मातब्बरांचे' पत्ते कट?
भाजपाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली नसली, तरी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांचे तिकीट कापले गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये माजी महापौरांसह काही ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
निष्ठावंत विरुद्ध आयाराम इच्छुकांचा होतोय संताप
भाजपाच्या सर्व बैठका, आंदोलने आणि पक्षीय कार्यक्रमांना न चुकता उपस्थित राहणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तीव्र नाराजी आहे. "आम्ही वर्षानुवर्षे पक्षाचे काम केले, पक्ष वाढवला; मात्र जे कधी बैठकीला फिरकले नाहीत किंवा जे दुसऱ्या पक्षातून नुकतेच दाखल झाले आहेत, त्यांना तिकीट देऊन सन्मानित केले जात आहे," अशी खदखद अनेक इच्छुकांनी खासगीत बोलून दाखवली आहे.
पक्षादेश शिरसावंद्य..
तिकीट कापल्याची चर्चा असली, तरी काही इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षात नाराजी असली तरी आम्ही शिस्तप्रिय कार्यकर्ते आहोत, त्यामुळे पक्षादेश शिरसावंद्य मानू," अशी अधिकृत प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली.