तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 14:59 IST2024-11-20T14:58:47+5:302024-11-20T14:59:10+5:30
असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकर निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.

तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
Tuljapur Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्रात आज २८८ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर गोंधळ उडाल्याच्या घटना घडल्या. अशातच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मतदान केंद्रावरील एक अधिकारीच वृद्ध मतदारांना एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्याच्या सूचना करत असल्याचा आरोप या व्हिडिओतून करण्यात आला आहे.
"मी एका उमेदवाराला मत देत असताना तिथल्या अधिकाऱ्याने मला खालच्या क्रमांकावरील उमेदवाराला मत देण्याची सूचना दिली," असा आरोप एका वृद्ध मतदाराने केला आहे. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकर निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात काय आहे मतदानाची स्थिती?
महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले असून ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ३८.५६ टक्के असे मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामतीत अनुक्रमे ३५.६३ आणि ३३.७८ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्वती मतदारसंघात २७.१९, पिंपरीत २१.३४, शिवाजीनगर २३.४६, वडगाव शेरी २६.६८ टक्के मतदान झाले आहे. पुणेकरांसमोर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०) मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.