शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:30 PM2019-04-12T19:30:08+5:302019-04-12T19:31:31+5:30

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

Shiv sena Candidate Omraje Nimbalkar name in farmer suicide note | शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या

शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या

googlenewsNext

उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच उस्मानाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. 

ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला कंटाळून कसबे तडवळे गावातील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. दिलीप ढवळे हे 59 वर्षांचे होते. शेतातील झाडाला गळफास लावून दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली आहे. 

ढवळे यांच्यात खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या दोघांनीही माझी आर्थिक फसवणूक केली आहे. माझ्या चार एकर जमिनीवर कर्ज घेऊन सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली.  हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनदा लिलावदेखील करण्यात आला. त्यातून गावामध्ये माझी बदनामी झाली. सततचा दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे मी आत्महत्या करत आहे असं ढवळे यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. दरम्यान कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं  ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने भाजपाला मतदान करू नका, असा संदेश या सुसाईड नोटमध्ये लिहून विष पिऊन आत्महत्या केली होती. 

Web Title: Shiv sena Candidate Omraje Nimbalkar name in farmer suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.