पायातील पैंजणाने सत्य समोर! बार्शीत अल्पवयीन मुलीचा छळ; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:54 IST2026-02-04T15:47:57+5:302026-02-04T15:54:57+5:30
अल्पवयीन प्रेयसीचा जाचाला कंटाळून अंत; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बैलगाडीतून नेऊन शेतात पुरला

पायातील पैंजणाने सत्य समोर! बार्शीत अल्पवयीन मुलीचा छळ; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला
Barshi Crime: पुण्यातील शिक्रापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा सासरच्या छळाला कंटाळून दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना फक्त आत्महत्येपुरती मर्यादित राहिली नाही. मुलीच्या मृत्यूनंतर आरोपींनी अत्यंत क्रूरपणे तिचा मृतदेह शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि हा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी बीडमधील प्रियकर आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत मुलगी ही पुण्यातील शिक्रापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. जुलै २०२५ मध्ये बीडचा रहिवासी अभिषेक आश्रुबा बांगर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर दोघेही बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी आले होते. तिथल्या राहत्या झोपडीत अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई बांगर यांनी अश्विनीचा छळ सुरू केला. "तुला स्वयंपाक येत नाही, ऊसतोडीचे काम जमत नाही," असे टोमणे मारत तिला सतत मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता.
सासरच्या जाचाला कंटाळून अश्विनीने १३ जानेवारीच्या मध्यरात्री झोपडीतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच, पोलीस कारवाईच्या भीतीने अभिषेक आणि त्याच्या आईने क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकला आणि गुपचूप शेतात नेऊन अर्धवट पुरून टाकला. त्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण काही दिवसांनी कुत्र्यांनी तो खड्डा उकरल्यामुळे हे सर्व भयानक सत्य लोकांसमोर आले.
पैंजणावरून पटली ओळख
२९ जानेवारी रोजी तुर्कपिंपरी परिसरात कुत्र्यांनी उकरल्यामुळे एक छिन्नविच्छिन्न मृतदेह बाहेर आला. मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की ओळख पटवणे कठीण होते. मृतदेहाचे डोके धडावेगळे झाले होते. मात्र, घटनास्थळी सापडलेले कपडे आणि पायातील पैंजण पाहून अश्विनीच्या वडिलांनी रडत रडत आपल्या लेकीची ओळख पटवली. या एका पैंजणाने आरोपी सापडले.
मायलेकावर गुन्हा दाखल, प्रियकर अटकेत
बार्शीपोलिसांनी संशयावरून अभिषेक बांगर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.