एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर धारदार शस्राने वार, चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 19:23 IST2020-08-01T19:22:49+5:302020-08-01T19:23:06+5:30
आरोपीने स्वतःवर वार करत केला आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर धारदार शस्राने वार, चिंचवडमधील घटना
पिंपरी : एकतर्फी प्रेमातून एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड मधील अजिंठानगर याठिकाणी घडली. आरोपीने स्वत:वर देखील वार करुन घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राणी सतीश लांडगे (वय 29, रा.अजिंठानगर, चिंचवड) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. अरविंद शेषराव गाडे (वय 30. रा. अजंठानगर) असे खुन करणा-या तरुणाचे नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, आरोपी अरविंद हा मागील सहा महिन्यांपासून मयत राणी हिला आपल्यासोबत बोलण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र तिच्याकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे चिडलेल्या अरविंदने तिच्यावर चाकुने हल्ला केला. राणी यांचे पती सतीश यांनी देखील अरविंद व राणी या दोघांनाही समजावून सांगितले होते. अरविंदच्या सततच्या त्रासाला कंटाळुन राणी हिने आपला मोबाईल क्रमांक देखील बदलला होता. तेव्हापासून त्याला फोन करणे शक्य होत नव्हते. संवाद होत नसल्याने तसेच राणीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने अरविंदने शेवटी टोकाचे पाऊल उचलले. राणीचा खुन केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळयात पडल्यावर त्याने स्वत:वर देखील चाकुने वार करुन घेतले. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. अरविंद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो एका खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो. तर राणीला तीन मुले असून ती एका शाळेत मदतनीस म्हणून काम करत होती.