World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. WTC स्पर्धेत न्यूझीलंड भारताविरुद्ध अपराजित राहिला आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेलं १३९ धावांचं माफक लक्ष्य न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून सहज पार केले. कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करताना भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी गुरूवारी एक ट्विट केले आणि त्यात त्यांनी मोठंय यश सहज मिळत नाही, असे म्हटले आहे.
जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन व रॉस अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले. कायले जेमिन्सनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले.
रवी शास्त्री यांनी ट्विट केलं की, या परिस्थितीत सर्वोत्तम संघ जिंकला. जागतिक जेतेपदाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर योग्य विजेता मिळाला. मोठं यश सहज मिळत नाही, हे या यशातून सिद्ध होतं. न्यूझीलंड संघानं सर्वोत्तम खेळ केला. त्यांच्याप्रती आदर..
संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) - २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) - १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) - २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६, इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) - २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)