Jemimah Rodrigues Named Delhi Capitals Captain For WPL 2026 : महिला विश्वचषकातील दमदार कामगिरीसह क्रिकेट जगतात आपली खास छाप सोडणाऱ्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जला मोठं बक्षीस मिळालं आहे. महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील २०२६ च्या हंगामासाठी (WPL 2026) दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी संघाने जेमिमा रोड्रिग्जची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. युवा बॅटर जेमिमाने दिग्गज मेग लॅनिंग हिची जागा घेतली आहे. लॅनिंग हिने WPL च्या पहिल्या तीन हंगामांत दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये नेले होते. पण तिन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DC फ्रँयायझीनं जेमिमाला दिलं कॅप्टन्सीच सरप्राइज
WPL च्या मेगा लिलावाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मेग लॅनिंग हिला रिलीज केले. एवढेच नाही तर मेगा लिलावात ती १.९० कोटी रुपयांसह UP वॉरियर्स संघात सहभागी झाली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघात नेतृत्वाची खांदेपालट होणार हे निश्चित होते. दिल्लीच्या संघाने ही जबाबदारी भारतीय महिला संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जकडे सोपवली आहे. DC फ्रँचायझी संघाने अगदी खास अंदाजात जेमिमाकडे नेतृत्व सोपवल्याची घोषणा केली.
ICC Rankings : DSP दीप्ती ठरली जगात भारी! स्मृती मानधनाला धक्का; लॉरानं पुन्हा हिसकावला मुकूट
तीन हंगामात जी ट्रॉफी हातून निसटली ती यावेळी जिंकून दाखवू
दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल संघाचे मालक आणि संघ व्यवस्थापनाचे मी मनापासून आभार मानते, असे जेमिमाह रॉड्रिग्सने म्हटले आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हे खरंच स्वप्नवत वर्ष ठरलं आहे. वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद आणि आता WPL च्या पहिल्या हंगामापासून माझ्या मनात खास स्थान असलेल्या फ्रँचायझी संघाकडून मोठी संधी मिळणं, हे शब्दांत मांडता येणार नाही, अशी शब्दांत २५ वर्षीय बॅटरनं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तीन हंगामात जी ट्रॉफी हातून निसटली ती यावेळी जिंकून दाखवू असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.
WPL मधील जेमिमाची कामगिरी
WPL च्या पहिल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सची पहिली पसंती ठरलेल्या जेमिमाने आतापर्यंत फ्रँचायझीसाठी २७ सामने खेळले आहेत. या कालावधीत तिने १३९.६७ च्या स्ट्राईक रेटसह ५०७ धावा केल्या असून, लीगच्या पहिल्या तीनही सिझनमधील फायनलमध्ये खेळताना दिसली आहे.