नवी दिल्ली - भारताचा एकेकाळचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तडाखेबंद फलंदाजीप्रमाणेची वीरूची लेखंदाजी आणि बोलंदाजीही तितकीच जबरदस्त आहे. दरम्यान, आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्याबाबत 12 वर्षांपूर्वी केलेल्या दोन भविष्यवाण्यांबाबत वीरूने भाष्य केले आहे. सौरव गांगुली एक ना एक दिवस बीसीसीआयचा अध्यक्ष बनेल, अशी भविष्यवाणी मी 2007 मध्येच केली होती, असे वीरूने म्हटले आहे.
एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात वीरेंद्र सेहवागने याबाबत माहिती दिली आहे. य लेखात वीरू म्हणतो की, ''मी जेव्हा सौरव गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्ष बनण्याबाबत ऐकले तेव्हा मला 2006-07 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आठवण झाली. त्यावेळी केपटाऊन कसोटी सुरू होती. मी आणि वासिम जाफर लवकर बाद झालो. काही कारणामुळे सचिन चौथ्या क्रमांकावर उतरू शकला नाही. त्यामुळे गांगुलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. तो सामना त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाचा होता. त्यामुळे गांगुलीवर खूप दबाव होता. पण त्याने ज्याप्रकारे दबाव झेलत फलंदाजी केली. तसे केवळ तोच करू शकतो.''
''त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आमच्यात झालेल्या चर्चेत आपल्यामधून जर कुणी बीसीसीआयचा अध्यक्ष बनू शकला तर तो सौरव गांगुलीच असेल, यावर आमचे एकमत झाले. त्यावेळी मी सौरव गांगुली बंगालचा मुख्यमंत्रीसुद्धा बनू शकतो, अशीही भविष्यवाणी केली होती. आता माझ्या दादाबाबतच्या दोन भविष्यवाण्यांपैकी एक खरी झाली आहे. आता दुसऱ्या भविष्यवाणीचे काय होते ते पाहू.'' असे वीरूने सांगितले.
भारताचा माजी कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीने 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. गांगुलीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 10 महिन्यांचा असेल.