Smriti Mandhana Palash Mucchal viral dance: भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आज विवाहबद्ध होणार आहे. संगीतकार पलाश मुच्छाल याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. स्मृतीच्या मूळ गावी सांगलीमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह सर्वांनी स्मृती आणि पलाश यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या ३-४ दिवसांपासून सांगलीमध्ये स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाचे विविध विधी आणि कार्यक्रम सुरू आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी नवदाम्पत्य स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल यांनी अफलातून डान्स करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या डान्सचा एक छोटासा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची जय्यत तयारी काही दिवसांपासून सुरू होती. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांसाठीही तयारी सुरू होती. काल स्मृतीच्या संगीत सोहळ्यात धमाल मजा मस्ती पाहायला मिळाली. स्मृती-पलाशच्या घरची मंडळी, मित्रपरिवार यांच्यासह अनेकांनी स्टेजवर डान्स करत कार्यक्रमाला बहर आणला. पण यात सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो म्हणजे वधू-वरांचा डान्स. स्मृती आणि पलाश यांनी सलाम-ए-इश्क या बॉलिवूड चित्रपटातील तैनु लेके मै जावांगा या गाण्यावर भन्नाट डान्स केला. यात महिला क्रिकेटर जेमिमा स्मृतीला स्टेजवर घेऊन आली आणि त्यानंतर पलाश स्मृती यांनी डान्स केला. डान्सच्या शेवटी पलाश-स्मृतीने अतिशय रोमँटिक पद्धतीने पोज देत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, याआधी कालच्याच दिवशी स्मृती आणि पलाश यांच्यात क्रिकेटचा संघात सामना रंगला. स्मृतीच्या संघात जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंह आणि ऋचा घोष यासारख्या भारतीय महिला संघातील तिच्या जवळच्या मैत्रिणींचा समावेश होता. तर पलाशच्या संघात त्याचे मित्रमंडळी होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पलाशने नाणेफेक जिंकली. त्यानंतर धमाल-मस्ती करत हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात नेमके कोण जिंकले, ते स्पष्ट करण्यात आले नाही.