भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. गांगुलीविरोधात अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज न भरल्यानं ही निवडणुक बिनविरोध झाली. नाट्यमय घडामोडीनंतर गांगुलीला हे अध्यक्षपद मिळाले आहे. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर भारतीय कर्णधार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरण्यासाठी गांगुली सोमवारी बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला. यावेळी निवड पक्की होताच गांगुलीनं आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यालयातील एका फोटोसोबत त्यानं सेल्फी काढून जुन्या सहकाऱ्यांसोबत हा आनंद साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. असा कोणता फोटो आहे की त्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह गांगुलीला आवरला नाही?
बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले. अध्यक्षपदासाठी बरेच राजकारण झाले, पण त्यामध्ये अखेर बाजी मारली ती गांगुलीने. जेव्हा ही खलबत सुरु होती तेव्हा गांगुलीला उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पण तिथून तो थेट अध्यक्ष झाला.
अध्यक्षपदावर निवड होताच गांगुली बीसीसीआयच्या मुख्यालयातील दुसऱ्या माळ्यावर गेला आणि तेथील एका फोटोसोबत सेल्फी काढली. या फोटोत गांगुलीसोबत
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे जुने सहकारी दिसत आहेत. त्यांच्यासोबत गांगुलीनं मैदानावर अनेक आनंदाचे क्षण साजरे केले आणि अध्यक्षपदाचा आनंदही त्याला त्यांच्यासोबत साजरा करावासा वाटला. पण, सध्यातरी त्यानं हे स्वप्न जुन्या सहकाऱ्यांच्या फोटोसोबत पूर्ण केले.