ब्रिस्बेन : अनुभवी रोहित शर्माने पुन्हा एकदा बेजबाबदार फटका मारून स्वत:चा बळी दिला. युवा शुभमान गिल हादेखील अवघ्या ७ धावा काढून माघारी फिरताच चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांचे उत्तर देणाऱ्या भारताने पावसाच्या अडथळ्याआधी दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ६२ अशी अडखळत सुरुवात केली.
पावसामुळे चहापानानंतरचा खेळ वाया गेला. रोहित शर्माने शानदार सुरुवात करीत ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. मात्र त्याला एकाग्रता भंगण्याचा फटका बसला. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या नाथन लियोन याने मिशेल स्टार्ककडे डिपमध्ये झेल देण्यास त्याला भाग पाडले. त्याआधी शुभमान गिलने पॅट कमिन्सच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथकडे झेल दिला. चहापानाच्यावेळी पुजारा ८ आणि कर्णधार अजिंक्य रहाणे २ धावांवर नाबाद होते. दोघांनी ३७ चेंडूत केवळ दोन धावा काढल्या. रोहितने कमिन्स आणि हेजलवूड यांचा मारा चाणाक्षपणे खेळून काढला. यादरम्यान त्याने सहा चौकार ठोकले.
भारताच्या युवा आणि अनुभवहीन गोलंदाजांनी मात्र फारच शिस्तबद्ध मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या पाच फलंदाजांना पहिल्या सत्रात ९५ धावात माघारी पाठविले.
अत्यंत अवसानघातकी फटका : गावसकर
रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारून बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियापासून समालोचनापर्यंत सर्नांनीच रोहित शर्मावर टीकास्त्र सोडत नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार फलंदाज सुनील गावसकर यांनीही रोहित शर्मावर नाराजी व्यक्त केली आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान ‘चॅनल ७’वर सुनील गावसकर समालोचन करत आहेत. गावसकर समालोचन करत असताना रोहित शर्मा खराब फटका मारून बाद झाला. रोहितवर गावसकरांनी आपल्या खास शैलीत नाराजी व्यक्त केली. गावसकर म्हणाले, ‘का? काय गरज होती? असा बेजबाबदार फटका मारायची गरज काय होती? लॉन्ग ऑन आणि डीप स्क्वेअरवर क्षेत्ररक्षक उभे होते. चौकारानंतर लगेच मोठा फटका मारण्याची गरज होती? सर्वात अनुभवी फलंदाज असताना असा फटका मारण्याची गरज नव्हती. आता कोणतेही कारण देऊन उपयोग नाही. कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर शतकात रूपांतर करावे लागते. प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ३६९ आहे, हे लक्षात ठेवायची गरज होती.’
‘सध्याचा भारतीय संघ नवखा आहे. नव्या दमाच्या संघात अनुभवाची कमतरता आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. संघात अनेक खेळाडू अगदीच नवोदित आहेत. संघात अनुभवाची उणीव आहे, हे माहिती असूनही रोहित शर्माने असा फटका मारायची गरज नव्हती.’
- संजय मांजरेकर
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. चहापानाच्या वेळेत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्याने दिवसाचा खेळ थांबिवला. आज, रविवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला अर्धा तास लवकर सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव :
डेव्हिड वॉर्नर झे. शर्मा गो. सिराज १, मार्कस हॅरिस झे. सुंदर गो. ठाकूर ५, मार्नस लाबुशेन झे. पंत गो. नटराजन १०८, स्टीव स्मिथ झे. शर्मा गो. सुंदर ३६, मॅथ्यू वेड झे. ठाकूर गो. नटराजन ४५,
कॅमरुन ग्रीन त्रि. गो. सुंदर ४७, टीम पेन झे. रोहित गो. ठाकूर ५०, पॅट कमिन्स पायचित गो. ठाकूर २, मिशेल स्टार्क नाबाद २०, नाथन लियोन त्री. गो. सुंदर २४, जोश हेजलवूड त्री. गो. नटराजन ११. अवांतर : २०, एकूण धावा : ११५.२ षटकांत सर्वबाद ३६९ धावा. गडी बाद क्रम : १/४, २/१७, ३/८७, ४/२००, ५२१३,६/३११, ७.३१३, ८/३१५, ९/३५४, १०/३६९. गोलंदाजी : सिराज २५-१०-६६-१, नटराजन २४.२-३-७८-३, ठाकूर २४-६-९३-३, सैनी ७.५-२-२१-०, सुंदर ३१-६-८९-३, रोहित ०.१-०-१-०.
भारत पहिला डाव:
रोहित शर्मा झे. स्टार्क गो. लियोन ४४, शुभमन गिल झे. स्मिथ गो. कमिन्स ७, चेतेश्वर पुजारा नाबाद ८, अजिंक्य रहाणे नाबाद २, अवांतर १, एकूण; २ बाद ६२ धावा. गडी बाद क्रम: १/११, २/६०. गोलंदाजी: स्टार्क ३-१-८-०, हेजलवूड ८-४-११-०, कमिन्स ६-१-२२-१, ग्रीन ३्-०-११-०, लियोन ६-२-१०-१.