आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रिंकू सिंह याने अल्पावधीच भारतीय क्रिकेटमध्ये आपली विशेष ओखळ बनवली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सकडून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना रिंकू सिंहने भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मात्र आता प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहची विकेट पडली असून, एका तरुण महिला खासदाराने रिंकूचा त्रिफळा उडवला आहे. रिंकू सिंह आणि उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा विवाह निश्चित झाला आहे. तसेच ८ जून रोजी निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचाही साखरपुडा होणार आहे.
क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा ८ जून रोजी लखनौ येथील एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यामध्ये कुटुंबीय आणि काही निकटवर्तीय उपस्थित राहतील. यावर्षीच जानेवारी महिन्यात दोघांचंहही लग्न ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ८ जूनला साखरपुडा झाल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दोघांचाही विवाह पारंपरिक पद्धतीने होईल, अशी माहिती प्रिया सरोज यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
प्रिया सरोज यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे असून, त्यांचे वडील तुफानी सरोज हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. तर प्रिया सरोज यांनी गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. प्रिया सरोज यांनी भाजपाच्या बी.पी. सरोज यांचा ३५ हजार ८५० मतांनी पराभव केला होता. तर रिंकू सिंह यानेही भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून, त्याने दोन एकदिवसीय आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत.
Web Title: Rinku Singh's female MP blows up Triphala in the love arena, engagement to be held on June 8
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.