नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला सपाटून मार खावा लागला असला तरी एका गोलंदाजानं सर्वांचे लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस यानं पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं डावाच्या अखेरच्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर हॅटट्रिक घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे. आता याच नॅथन एलिसला ( Nathan Ellis) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) ऑस्ट्रेलियाच्या या युवा गोलंदाजाला आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी करारबद्ध केले आहे. पंजाब किंग्सचे दोन खेळाडू झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ हे दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीत. पंजाब किंग्सनं लिलावात रिचर्डसनसाठी १४ कोटी, तर मेरेडिथसाठी ८ कोटी मोजले. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात या दोन्ही खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आली नाही. मेरेडिथनं पाच सामन्यांत चार, तर रिचर्डसननं तीन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या.
पंजाब किंग्सचे CEO सतीश मेनन यांनी नॅथन एलिसला करारबद्ध केलेल्या वृत्ताला दुजोरा दिला. रिचर्डसन व मेरेडिथ यांनी तंदुरुस्तीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. २०२१च्या लिलावात एलिस अनसोल्ड राहिला होता. २० लाख ही त्याची मुळ किंमत होती. आता २२ वर्षीय गोलंदाजाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानं दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. एकूण ३३ ट्वेंटी-२० सामन्यांत ३८ विकेट्स आहेत.