भारतीय क्रिकेटचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि २०११च्या विश्वचषकाचा नायक युवराज सिंग याने आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीमागचे खरे आणि अत्यंत भावनिक कारण अखेर उघड केले.
टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना युवराजने स्पष्ट केले की, निव्वळ फॉर्म किंवा दुखापत नव्हे, तर सन्मानाची कमतरता हे त्याच्या निवृत्तीचे मुख्य कारण होते.
'क्रिकेट एन्जॉय कर असा मला सल्ला होता. पण कारकिर्दीच्या शेवटी मी क्रिकेट एन्जॉय करत नव्हतो. मी क्रिकेट एन्जॉय करू शकत नसेन, तर मी क्रिकेट का खेळतोय असा प्रश्न मला पडला होता.'
'मला हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता, मानही दिला जात नव्हता. माझा अपमान व्हायचा. मला असंही वाटत होतं की, जर मला मजा येत नसेल तर मी कशाला क्रिकेट खेळत राहू?'
'ज्या गोष्टी करताना मलाच समाधान वाटत नाही, ते मी का करत बसू? मी का खेळणं सुरु ठेवू? मनाविरूद्ध क्रिकेट खेळून मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी स्वत:लाच त्रास देत होतो.'
'जेव्हा मी क्रिकेट खेळणं थांबवलं, तेव्हा मी लगेच आधीसारखाच तंदुरूस्त झालो. मला छान वाटू लागले,' असे युवराज सिंगने निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना स्पष्टपणे सांगितले.