२०२५ या वर्षात भारतीय क्रिकेट संघाने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये खास छाप सोडली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजयासह टीम इंडियाने वर्षाची सुरुवात धमाकेदार केली. पण इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटीतून अचानक निवृती घेतली.
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळणार असल्यामुळे २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ते संघातील आपले स्थान टिकवणार का? अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. पण या जोडीनं ज्या फॉरमॅटमध्ये खेळणार तिथं धमाका करणार असा शो दाखवून दिला.
वनडेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी राहिला. दुसऱ्या बाजूला आयसीसी क्रमवारीत वनडेतील 'नंबर वन' बॅटर ठरलेल्या रोहित शर्मा त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहिला.
इथं एक नजर टाकुयात विराट कोहली आणि रोहित शर्मासह २०२५ मध्ये भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
२०२५ या वर्षात वनडे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतकासह ६५१ धावा केल्या. वर्षाअखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत कोहलीनं दोन शतकासह १ अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्मानं यंदाच्या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. १४ डावात त्याने २ शतके आणि ४ अर्धशतकाच्या मदतीने ६५० धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची मॅच इनिंग खेळी केली होती.
श्रेयस अय्यरनं मधल्या फळीतील जबाबदारी अगदी उत्तमरित्या बजावताना ११ डावात ४९६ धावा काढल्या. त्याची सरासरीही ५० आसपास राहिली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे तो संघाबाहेर पडला होता.
भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलनं ११ सामन्यात ४९० धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतकांसह २ अर्धशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.