ICC World Test Championships, WTC Points Table – दक्षिण आफ्रिकेने गुरूवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर यजमान इंग्लंडला ३ दिवसांत गुडघे टेकायला लावले. आफ्रिकेने १ डाव व १२ धावांनी कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली, शिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2023) फायनलमध्ये एक पाऊल टाकलं आहे. आफ्रिकेच्या गुणांची टक्केवारी ७५ टक्के झाल असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ७० टक्के आहेत. इंग्लंड सातव्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ ५२.०८ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीने यजमानांचा पहिला डाव १६५ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात आफ्रिकेने दमदार खेळ करताना ३२६ धावा करून पहिल्या डावात १६१ धावांची आघाडी घेतली. बेन स्टोक्स ( ३-७१), स्टुअर्ट ब्रॉड ( ३-७१) व मॅथ्यू पॉट्स ( २-७९) यांनी चांगली गोलंदाजी केली. पण, आफ्रिकेच्या डावात चर्चेत राहिला तो इंग्लंडचा महान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) त्याने लॉर्ड्सवर १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाच, शिवाय एक अफलातून झेलही टिपला.
इंग्लंडकडून पहिल्या डावात ऑली पोपने ( ७३) सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स ( २०) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कागिसो रबाडाने ५२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मार्को येनसन ( २-३०) व एनरिच नॉर्खिया ( ३-६३) यांनी त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकेचे सलामीवीर डीन एल्गर ( ४७) व सॅरेल एर्वी ( ७३) यांनी दमदार सुरूवात करून दिली. मधल्या फळीत थोडी गडबड झाली. किगन पीटरसन ( २४), एडन मार्कराम ( १६) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १९) हे झटपट माघारी परतले. मार्को येनसेनने ४८ धावांची खेळी केली, तर केशव महाराजने ४१ धावा केल्या.
इंग्लंडचा दुसरा डाव १४९ धावांत गडगडला. एनरिच नॉर्खिया ( ३-४७) , मार्को येनसन ( २-१३), कागिसो रबाडा ( २-२७) व केशव महाराज ( २-३५) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. इंग्लंडकडून अॅलेक्स लीस ( ३५) व स्टुअर्ट ब्रॉड ( ३५) यांनी संघर्ष केला. आफ्रिकेने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील एक स्थान स्वतःच्या नावावर पक्के केले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंडने WTC चे जेतेपद नावावर केले होते. दुसऱ्या पर्वात दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने आघाडीवर आहे. भारतीय संघ दुसरा फायलनिस्ट बनू शकतो आणि त्यांच्या हातात दोन मालिका आहेत.
भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे , तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. जून ३०मध्ये जागतिक कसोटी स्पर्धा संपतेय. सध्या भारतीय संघ ५२.०८ टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सहा कसोटी जिंकाव्या लागतील, तर भारताची टक्केवारी ६८.०६ इतकी होईल.
पण, ऑस्ट्रेलियाच्या ९ कसोटी शिल्लक आहेत. त्यापैकी पाच घरच्या मैदानावर, तर चार भारतात होणार आहेत. वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी घरच्या मैदानावर होणार आहेत. ऑसींनी घरच्या मैदानावरील पाचही कसोटी जिंकल्यास व भारताविरुद्धची मालिका गमवल्यास त्यांची टक्केवारी ६३.१६ इतकी होईल आणि भारताने त्यांच्या उर्वरित सहा कसोटी जिंकल्यास ते ऑसींना मागे टाकतील. ९ पैकी ऑसींनी ६-३ असा निकाल लावल्यास ६८.४२ टक्क्यांसह त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.