अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्स राखून पराभव करत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दोनशेपार मजल मारत बंगळुरूसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी झालेली एक छोटीशी चूक दिल्लीला महागात पडली आणि त्यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी निसटली.
दिल्ली कॅपिल्सच्या संघाने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग चौथ्यांदा WPLच्या अंतिम लढतीत धडक दिली होती. मात्र यावेळीही त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली. जेमिमा रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २०३ धावा कुटत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०४ धावांच आव्हान ठेवलं होतं. दिल्लीकडून कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स हिने ५७ धावांचा खेळी केली होती.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार स्मृती मंधाना आणि जॉर्जिया वोल यांनी केलेल्या १६५ धावांच्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर जोरदार पाठलाग केला. आता बंगळुरूचा विजय निश्चित आहे असे वाटत असतानाच जॉर्जिया वोल (७९), रिचा घोष (६) आणि स्मृती मंधाना (८७) ह्या एका पाठोपाठ एक करून माघारी परतल्याने सामना रंगतदार स्थितीत पोहोचला. मात्र याचदरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या क्षेत्ररक्षकांकडून एक मोठी चूक झाली.
त्याचं झालं असं की, १९ व्या षटकात स्मृती मंधाना बाद झाल्यावर बंगळुरूला विजयासाठी ८ चेंडूत १३ धावांची गरज असताना राधा यादव फलंदाजीसाठी मैदानात आली. त्यावेळी चिनेल हेन्रीच्या गोलंदाजीवर मिन्नू मणि हिने राधा यादव हिचा झेल सोडला. जर मिन्नू हिने हा झेल पकडला असता तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं.
१९ व्या षटकात दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनी हा झेल सोडल्यानंतर अखेरच्या ६ चेंडूंमध्ये बंगळुरूला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. त्यात पहिल्या २ चेंडूत केवळ २ धावा आल्याने ४ चेंडूत ८ धावा असं समीकरण बनलं. याचवेळी राधा यादव हिने श्री चरणीने टाकलेल्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर सलग दोन चौकार ठोकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.