Join us

WTC 23 standings : जोहान्सबर्गवरील पराभव टीम इंडियाला महागात पडणार?; विराट अँड कंपनी आता कशी WTC Final मध्ये पोहोचणार?, बिघडलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:11 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद ( World Test Championship 2021) स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. न्यूझीलंडनं अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपदाची ट्रॉफी नावावर केली. पण, WTC 2023 या दुसऱ्या पर्वात सर्व संघ ताकदीनं खेळताना दिसत आहेत.

2 / 10

आतापर्यंत भारतानं सर्वाधिक तीन कसोटी मालिका खेळल्या आहेत, परंतु गुणतालिकेत त्यांचे वर्चस्व दिसत नाही. ICCच्या सुधारित नियमामुळे खात्यात सर्वाधिक गुण असूनही भारताकडे अव्वल स्थान नाही. त्यात गुरुवारी दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्ग कसोटी जिंकून इतिहास घडवला अन् त्याचा फटका टीम इंडियाला WTC PointTable मध्ये बसलाय. हा पराभव भारताच्या अन् WTC Final यांच्यातला मोठा अडथळा ठरेल का?, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे.

3 / 10

भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेनं २२९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, दुसऱ्या डावात भारतालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी खेळी अन् हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारतानं २ ६६ धावा करून आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले.

4 / 10

तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत डीन एल्गरनं खिंड लढवत आफ्रिकेला २ बाद ११८ धावा उभारून दिल्या. चौथ्या दिवशी पावसामुळे साडेपाच तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर ३४ षटकांच्या डावात आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून विजय मिळवत इतिहास घडवला.

5 / 10

जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते.

6 / 10

आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं. या पराभवामुळे टीम इंडियाचा WTC Final मध्ये जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे.

7 / 10

जोहान्सबर्गवरील विजय हा दक्षिण आफ्रिकेचा नववर्षीतील पहिलाच विजय आहे आणि त्यांनी खात्यात १२ गुणांची कमाई करताना पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. भारताच्या खात्यात सर्वाधिक ५३ गुण आहेत, परंतु त्यांची जय-पराजयाची टक्केवारी ही ५५.२१ इतकी असल्याने ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

8 / 10

ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांत ३ विजय मिळवताना १०० टक्के निकालामुळे ३६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. श्रीलंकेचे २४ गुण असले तरी त्यांची टक्केवारीही १०० इतकी आहे आणि ७५ टक्के असलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

9 / 10

भारतानं आतापर्यंत ४ विजय, दोन पराभव व दोन ड्रॉ असे निकाल लावले आहेत. त्यात त्यांच्यावर आयसीसीनं षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे तीन गुण वजा करण्याची कारवाई केली आहे.

10 / 10

आता भारताला तिसऱ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल. या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील दोन सामने हे श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर होतील, तर एक कसोटी इंग्लंड दौऱ्यावर होणार आहे.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App