आपल्या पुरुष संघाप्रमाणे ट्वेंटी-२० विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारताचा महिला संघ प्रयत्नशील असेल. काही महिन्यांपूर्वी भारताच्या पुरुष संघाने जग्गजेता होण्याचा मान पटकावला.
स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांकडे पाहिले जात आहे.
महिला विश्वचषकात चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दहा देशांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला नेहमीच वरचढ राहिला आहे. अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
तीन ऑक्टोबरपासून यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबरला होईल.
अनुभवी खेळाडूंची फळी असलेल्या भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असेल. कांगारुंनी सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकला आहे. सहा तारखेला भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असतील.
महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले.
ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा ॲलिसा हिलीच्या नेतृत्वात असेल. राष्ट्रकुल स्पर्धा आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळल्याचा अनुभव हिलीकडे आहे. माजी कर्णधार मेग लॅनिंगच्या पावलावर पाऊल टाकत तिने ऑस्ट्रेलियन संघाचा विजयरथ कायम ठेवला.