घरच्या मैदानावर जवळपास १२ वर्षांपासून एकही कसोटी मालिका न गमावलेल्या टीम इंडियावर गेल्या १२ महिन्यांत दुसऱ्यांदा कसोटी पराभवाची फार मोठी नामुष्की ओढवली.
भारतीय संघाचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा आणि वाईट पराभव झाला. २०१२ ते २०२४ दरम्यान घरच्या मैदानावर जेमतेम पाच ते सहा सामने गमावणाऱ्या टीम इंडियाने गंभीर प्रशिक्षक झाल्यावर दोन बड्या संघाविरूद्ध घरच्या मालिका गमावल्या.
गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिक आहे. भारतीय चाहते गौतम गंभीरला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. त्याची कोच पदावरून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी भारतीय चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी मात्र भारतीय मुख्य प्रशिक्षक गंभीरची पाठराखण केली. 'गौतम गंभीर हा कोच आहे. कोच फक्त संघ तयार करतो. पण मैदानावर उतरल्यानंतर खेळाडूंनाच आपला सर्वोत्तम क्रिकेट खेळून दाखवायचे असते.
'आता जे लोक गौतम गंभीरवर टीका करत आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की, त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला, त्याच्याच कोचिंगमध्ये भारतीय संघ आशिया कप जिंकला. त्यावेळी तुम्ही लोकांनी काय केलंत? तेव्हा तुम्ही कुठे होतात?'
'आता तुम्ही म्हणताय की गंभीरची हकालपट्टी करा. पण भारताने दोन मोठ्या स्पर्धा जिंकल्या तेव्हा तुम्ही म्हणालात का, की गंभीरला वनडे-टी२० क्रिकेट संघाचा कायमचा कोच बनवला पाहिजे, किंवा त्याचे सध्या असलेले कॉन्ट्रक्ट वाढवून दिले पाहिजे.'
'संघ खराब खेळतो तेव्हाच तुम्हा लोकांना कोच दिसतो. जर संघाच्या यशाचे क्रेडिट तुम्ही गंभीरला द्यायला तयार नसाल तर मग संघाच्या अपयशासाठी किंवा खेळाडूंच्या चुकीसाठी त्याला दोष का देता?' असे अतिशय रोखठोक मत सुनील गावसकर यांनी मांडले.