बीसीसीआयच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारणसभेमध्ये मिथून मन्हास यांची मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले मिथुन मन्हास आहेत तरी कोण, असा प्रश्न काहींच्या मनात उपस्थित झाला आहे.
तर मिथुन मन्हास हे माजी क्रिकेटपटू असून, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीरच्या संघांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच आयपीएलमध्येही दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्स संघातून ते खेळले आहेत.
यादरम्यान, मिथुन मन्हास हे आयपीएलमध्ये वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली खेळलेले आहेत. त्यांनी आयपीएलच्या ५५ सामन्यांत २२.३४ च्या सरासरीने ५१४ धावा काढल्या होत्या.
मिथुन मन्हास यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १५७ सामन्यात २७ शतकांसह ४५.८२ च्या सरासरीने ९ हजार ७१४ धावा काढल्या आहेत.
२००८ साली दिल्लीच्या संघाने रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. त्या हंगामात मिथुन मन्हास यांनी आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्लीच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. पुढे २०१५-१६ च्या हंगामात ते जम्मू काश्मीरच्या संघात दाखल झाले होते.
मिथुन मन्हास यांनी दिल्लीच्या संघाचं नेतृत्वसुद्धा केलं होतं. तसेच विराट कोहलीने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा मिथुन मन्हास हेच दिल्लीचे कर्णधार होते.