IPL 2025 पूर्वीचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव सर्व संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. यावेळी सर्व संघांना जास्तीत जास्त ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी होती. अशा परिस्थितीत सर्वच संघांना नवे आणि युवा खेळाडू संघात घेत संघ मजबूत करण्याची संधी आहे.
नेहमीप्रमाणे यंदाच्या लिलावातही युवा खेळाडूंचा भरणा आहे. या मेगालिलावात सध्या एका मराठमोळ्या १९ वर्षांच्या खेळाडूची खूप चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या ४ संघांनी त्याला चाचणीसाठी व खेळ पाहण्यासाठी बोलावून घेतले होते.
IPL 2025 मेगा लिलावासाठी जगभरातून एकूण १,५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७४ खेळाडूंची यादी फायनल करण्यात आली आहे. त्यात १९ वर्षीय युवा अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीचेही नाव आहे. अर्शीनला मेगा लिलावापूर्वी चार संघांनी चाचण्यांसाठी बोलावले होते.
अर्शीन कुलकर्णीचा जन्म १५ फेब्रुवारी २००५ ला सोलापूरमध्ये झाला. अर्शीन हा उजव्या हाताचा फलंदाज असून वेगवान गोलंदाजीही करतो. महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील शतकाच्या माध्यमातून तो प्रकाशझोतात आला.
यानंतर, १९ वर्षाखालील विश्व चषकासाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेत ७ सामन्यात त्याने २७ च्या सरासरीने १८९ धावा केल्या. त्यात एका शतकाचाही समावेश होता. याशिवाय त्याने ५ सामन्यात गोलंदाजी केली आणि ४ गडीही बाद केले.
अर्शीन हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याचा फार मोठा चाहता आहे. जॅक कॅलीसदेखील अर्शीन प्रमाणेच उजव्या हाताचा फलंदाज होता आणि वेगवान गोलंदाजीही करायचा. त्यामुळे अर्शीन कॅलिसला आपला आदर्श मानतो.
IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्याला २० लाखांना संघात घेतले. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळला पण त्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. यानंतर तो आणखी एक सामना खेळला, पण त्या सामन्यातही त्याला केवळ ८ धावा करता आल्या.