किंग कोहली बनला 'वॉटर बॉय', सहकाऱ्यांना पाणी देऊन केली 'विराट' कमाई; किती लाख मिळाले?

asia cup 2023 : प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेला विराट 'वॉटर बॉय' बनून आपल्या सहकाऱ्यांना मदत करत होता.

रनमशीन, किंग, दिग्गज अशा विविध नावांनी जगभर ख्याती असलेला विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात किंग कोहलीच्या अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले.

प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेला विराट 'वॉटर बॉय' बनून आपल्या सहकाऱ्यांना मदत करत होता. त्याचा एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वॉटर बॉय म्हणून आनंद लुटत असल्याचे दिसते.

खरं तर संघाबाहेर असलेल्या विराटला प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा नसताना देखील लाखोंची कमाई झाली.

आशिया चषक २०२३ च्या सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात शुक्रवारी भारत आणि बांगलादेश आमनेसामने होते. या सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच बदल केले. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडियाने विराट कोहलीसह हार्दिक पांड्याला विश्रांती दिली होती. यावेळी विराट कोहली मैदानावर सहकारी खेळाडूंना पाणी देताना दिसला.

विराट कोहलीला पाणी देण्यासाठी देखील लाखो रुपये मिळाले. कारण एक वन डे आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना सहा लाख रुपये मिळतात. म्हणजेच प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ११ खेळाडूंना ६ लाख रुपये मिळाले.

नियमांनुसार जे खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतात त्यांना अर्धी मॅच फी दिली जाते. म्हणजे विराटला तीन लाख रुपये मिळाले असतील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या खेळाडूंना एका वन डे सामन्यासाठी प्रत्येकी सहा लाख रुपये देते, तर ट्वेंटी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना तीन लाख रुपये दिले जातात, तर कसोटीमध्ये ही रक्कम १५ लाख रुपये होते.

किंग कोहलीने आशिया चषकाच्या यंदाच्या पर्वात चमकदार कामगिरी केली. त्याने सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावून टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७७ शतके झळकावली आहेत. महान सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या दिशेने तो वेगाने वाटचाल करत आहे. विराट लवकरच सचिनचा वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम मोडू शकतो. कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये ४७ शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० धावा पूर्ण केल्या. याशिवाय विराटने वनडेमध्ये सर्वात जलद ८ हजार, ९ हजार, १० हजार, ११ हजार आणि १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.