Virat Kohli vs Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट वर्तुळात आता आरोप-प्रत्यारोपाचा वाद सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. विराट कोहलीची ( Virat Kohli ODI Captancy) वन डे कर्णधारपदावरून गच्छंती केल्यानंतर रोज नवीन वाद समोर येत आहे. त्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कसोटी संघाचा कर्णधार विराटनं सर्व वादांवर सडेतोड उत्तर मांडले.
ते करत असताना BCCIनं कसं 90 मिनिटांच्या चर्चेअंती वन डे कर्णधारपदावरून काढल्याची माहिती दिली, हा धक्कादायक खुलासा केला. शिवाय त्यानं ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यावरून BCCIच्या कोणत्याच अधिकाऱ्यानं हा निर्णय घेऊ नको अशी विनंती केली नसल्याचा गौप्यस्फोट करून BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला खोटे ठरवले.
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी गांगुलीला फटकारताना या विसंगतीवर उत्तर देण्याचे आवाहन केलं. ते म्हणाले,''विराट कोहलीच्या विधानामुळे BCCI चर्चेत आलीय असं मला वाटत नाही. माझ्या मते ज्या व्यक्तीनं त्याला विचारणा केल्याचा दावा केला आहे, त्यानं खरं खोटं सांगायला हवं आणि ती व्यक्ती बीसीसीआय अध्यक्ष गांगुली ही आहे. त्यामुळे ही विसंगती का, याचे उत्तर त्यानं द्यायला हवं. या विसंगतीचं उत्तर देणारी योग्य व्यक्ती गांगुलीच आहे. ''
आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनीही विराट व गांगुली या वादात उडी मारली आहे. विराट कोहलीच्या विधानातून बीसीसीआय व त्याच्यातील कर्णधारपदावरूनचे मतमतांतर समोर आले आहेत, परंतु दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी उगाचच हा वाद उकरून काढण्याची ही ती वेळ नाही, असे ते म्हणाले.
'' महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी एकमेकांकडे बोट दाखवण्याची ही ती वेळ नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायला हवं. BCCIचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा कर्णधार ही दोन्ही मानाची पदं आहेत, परंतु असं सार्वजनिकरित्या एकमेकांविरोधात बोलणे योग्य नाही. मग तो सौरव असो किंवा कोहली,''असे १९८३च्या वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव म्हणाले.
''तुम्ही ही परिस्थिती योग्यरितीने हाताळा आणि देशाचा विचार कराल, तर ते योग्य ठरेल. जे चुकीचं आहे ते आज ना उद्या समोर येईलच, परंतु दौऱ्यावर जाण्याआधी असा वाद निर्माण करणे चुकीचे आहे,''असा सल्लाही त्यांनी दिला. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज रवाना झाले आणि २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
विराट कोहलीच्या विधानानंतर २४ तास होऊनही बीसीसीआयकडून अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.