विराट कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यापासून विराट आणि बीसीसीआयमध्ये उघडपणे वाद पेटला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडालेली आहे.
दरम्यान, या वादादरम्यानच तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघालेल्या भारतीय संघातील काही खेळाडूंचे विमानामधील काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. मात्र या फोटोंमधून बीसीसीआयने काही मोठे संकेत दिले आहेत.
बीसीसीआयने एकूण चार फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, मयांक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव दिसत आहेत. मात्र या फोटोंमधून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली गायब आहे.
त्यामुळे या फोटोंमधून बीसीसीआयने सध्या उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या विराट कोहलीला गंभीर इशारा दिल्याचे मानले जात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन पार्कमध्ये खेळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत एकूण ३९ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी १५ सामने दक्षिण आफ्रिकेने तर १४ सामने भारताने जिंकले आहेत. तर १० सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतीय संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. तसेच यावेळी काही खास प्रयत्न करून दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो, असे विराट कोहलीने म्हटले आहे.