महिन्याभराच्या या स्पर्धेनंतर आयसीसीनं सोमवारी या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जाहीर केला. १२ जणांच्या या संघात पाकिस्तान आणि भारताच्या प्रत्येकी दोन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे सर्वाधिक ४ जणं या संघात आहेत. भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याला ट्वेल्थ मॅन ( बारावा खेळाडू) म्हणून संघात सहभागी करून घेतले गेले आहे.
ॲलेक्स हेल्स ( इंग्लंड ) - इंग्लंडच्या ओपनरने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताविरुद्ध ४७ चेंडूंत नाबाद ८६ धावांची खेळी करताना संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक २१२ धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ४२.४०च्या सरासरीने आणि १४७.२२ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केलीय.
जोस बटलर ( इंग्लंड ) - इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा महेंद्रसिंग धोनीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला यष्टीरक्षक-कर्णधार ठरला. त्याने इंग्लंडसाठी दोन मॅच विनिंग खेळी केल्या. सुपर १२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने ४७ चेंडूंत ७३ धावांची खेळी केली, तर उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४९ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. बटलरने इंग्लंडकडून या स्पर्धेत सर्वाधिक २२५ धावा केल्या आहेत.
विराट कोहली ( भारत) - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली याचाही या संघात समावेश केला गेला आहे. कोहलीने या स्पर्धेत ९८.६६च्या सरासरीने २९६ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत चार अर्धशतकं झळकावली आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची अविस्मरणीय खेळी केली.
सूर्यकुमार यादव ( भारत ) - भारताच्या मधल्या फळीचा भार सूर्यकुमार यादवने सक्षमपणे या स्पर्धेत सांभाळल्याचं दिसले. सूर्याने त्याच्या आक्रमक फटकेबाजीने भल्याभल्या प्रतिस्पर्धींना पाणी पाजले. त्याने या स्पर्धेत १८९.६८च्या स्ट्राईक रेटने २३९ धावा केल्या.
ग्लेन फिलिप्स ( न्यूझीलंड) - न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने या स्पर्धेत २०१ धावा केल्या आणि क्षेत्ररक्षणातही त्याने मौल्यवान योगदान दिले. सुपर १२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध किवींची अवस्था ३ बाद १५ अशी झालेली असताना फिलिप्सने शतकी खेळी केली.
सिकंदर रजा ( झिम्बाब्वे ) - अष्टपैलू सिकंदर रजाने यंदाची स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली. त्याने १४७.९७च्या सरासरीने २१९ धावा केल्या आणि ६.५०च्या इकॉनॉमीने १० विकेट्स घेतल्या. सुपर १२मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सिकंदरने तीन विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
शादाब खान ( पाकिस्तान) - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शंभर टक्क्यांहून अधिक योगदान दिले. त्याने ९८धावा केल्या आणि ११ विकेट्सही घेतल्या. शिवाय क्षेत्ररक्षणात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली
सॅम करन ( इंग्लंड) - आयसीसी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सॅम करनने या टीममध्ये स्थान पटकावले नसते तर आश्चर्य वाटले असते. वर्ल्ड कप स्पर्धेत डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याने छाप पाडलीआहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने ४ षटकांत १२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत एकूण त्याने १३ विकेट्स घेतल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला.
एनरिच नॉर्खिया ( दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेला भले सुपर १२ मध्येच गाशा गुंडाळावा लागला असला तरी त्यांचा गोलंदाज नॉर्खिया याची कामगिरी दुर्लक्षित करता येणारी नाही. त्याने पाच सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या.
मार्क वूड ( इंग्लंड ) - दुखापतीमुळे मार्क वूडला उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या सामन्याला मुकावे लागले. पण, त्याने सुपर १२ च्या सामन्यांत वेगवान मारा करताना प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवली. त्याने चार सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.
शाहिन शाह आफ्रिदी ( पाकिस्तान) - दुखापतीमुळे शाहिनला अंतिम सामना अर्ध्यावर सोडावा लागला. या स्पर्धेत त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु नंतर त्याने लय पकडली.
१२ वा खेळाडू - हार्दिक पांड्या ( भारत) - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा या संघात बारावा खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे. उपांत्य फेरीत त्याने३ ३३ चेंडूंत ६३ धावांची दमदार खेळी केली होती.