भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने खेळाच्या जगात आपल्या फलंदाजीसोबतच फिटनेसमुळेही वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेट संघाला सध्या जगातील सर्वोत्तम फिल्डिंग युनिट म्हणून ओळखले जाते. टीम इंडियाला या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं बहुतांश श्रेय हे विराट कोहलीसारख्या खेळाडूंना जातं.
भारतीय क्रिकेटमध्ये विराट युगाच्या आगमनानंतर फिटनेस त्याच्या सहकारी खेळाडूंसाठी प्राथमिकता बनली. विराटने स्वत:चं उदाहरण समोर करून संघाचं नेतृत्व केलं.
सध्या विराट कोहली फलंदाजीध्ये खराब फॉर्मचा सामना करत असला तरी तो भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत खेळाडूंपैकी एक आहे. विराटने एका मुलाखतीमध्ये शरीर आणि मेंदूला फिट ठेवण्यासाठीचा आपला फिटनेस आणि डाएट प्लॅन सांगितला होता.
आपल्या डाएट प्लॅनवर बोलताना विराटने सांगितले की, एकेकाळी मी डाएट आणि फिटनेसवर लक्ष दिले नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मी माझ्या खानपानाच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. तसेच मी अधिक अनुशासित झालो आहे. मी जे भोजन घेतो त्याबाबत जागरुक राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो.
विराटने पुढे सांगितले की, काय करावं आणि काय करू नये हे माझ्यासाठी खूप सरळ आणि सोपे आहे. साखर, ग्लुटेनचा आहारातील समावेश टाळतो. डेअरी उत्पादनांपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करतो. एक अजून गोष्ट जिने मला आपल्या आरोग्याला कंट्रोल करण्यात मदत केली आहे, ती म्हणजे माझ्या पोटाच्या क्षमतेच्या ९० टक्के भोजन होय.
विराटने पुढे सांगितले की, माझ्यासारख्या खाण्याचा शौकिन असलेल्या व्यक्तीसाठी सर्व गोष्टी सोप्या नव्हत्या. मात्र जेव्हा तुम्ही शरीरामध्ये सकारात्मक बदल पाहू लागता, तेव्हा निरोगी राहणे ही एक सवय बनते.
विराटने सांगितले की, मला जे करायची आवश्यकता आहे, मग ते माझे डाएट असो, फिटनेस रुटिन असो ते मी करतो की नाही यावरं माझं लक्ष असतं.