भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देण्याच मोलाचा वाटा उचलणारा धडाकेबाज फलंदाज उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे. त्याने ट्विटरवर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करून विवाहाची माहिती दिली आहे.
उन्मुक्त चंदचा विवाह सोहळा काही मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला.
उन्मुक्त चंदने सिमरन खोसला हिच्यासोबत सप्तपदी घेतली आहे. सिमरन ही फिटनेस आणि स्पोर्ट्स न्युट्रिशन कोच आहे.
उन्मुक्त चंद याने यावर्षीच भारतीय क्रिकेटला रामराम ठोकत अमेरिकेमधून खेळण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता तो बिग बॅशमध्येही खेळणार आहे.
उन्मुक्त चंद याने २०१२ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना देशाला विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच फलंदाज म्हणूनही त्याने उल्लेखनीय खेळ केला होता.
दरम्यान, आपल्या कारकिर्दीची दणक्यात करणाऱ्या उन्मुक्त चंदला नंतर फारशी चमक दाखवता आली नाही. आयपीएल तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी सुमार झाली. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर त्याने अमेरिकेतून खेळण्याचा निर्णय घेतला.
आता उन्मुक्त ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-२० मध्येही खेळणार आहे. या स्पर्धेत तो मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळणार आहे.