ODI Record : सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ; टीम इंडिया कितव्या स्थानी?

या संघाने वनडेत पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत रचला इतिहास

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३-२७ पात्रता फेरीतील सामन्यात नेदरलंडच्या संघाने वनडेत पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत स्कॉटलंडला पराभूत करुन दाखवलं.

वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामन्यात घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात ३६९ धावा केल्या होत्या.

नेदरलंडच्या संघाने ४ विकेट अन् ४ चेंडू राखून ३७४ धावा करत हा सामना जिंकला. पहिल्यांदाच ३०० पारची लढाई जिंकताना 'लिंबू टिंबू' नेदरलंड संघाने सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा विक्रम मागे टाकला आहे. इथं एक नजर टाकुयात वनडेत सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघाच्या खास रेकॉर्डवर

वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वात आघाडीवर आहे. २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ४३५ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत वनडेत वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता. हा विक्रम अद्यापही कायम आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाचाच नंबर लागतो. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ३७२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

नेदरलंडचा संघ या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ३७० धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवलाय.

भारतीय संघ या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. २०१३ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ३६० धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता.