Suryakumar Yadav बनू शकतो ICC T20I Cricketer of the Year, पण 'हे' ३ स्टार खेळाडू ठरू शकतात अडथळा

सूर्यकुमारला टक्कर देण्यासाठी चक्क झिम्बाब्वेचाही खेळाडू शर्यतीत आहे

Suryakumar Yadav, ICC awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC प्रत्येक वर्षाच्या शेवटी खेळाडूंना विशेष पुरस्कार देत असते. यंदाच्या सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटर पुरस्कारासाठी (T20I Cricketer of the Year) नामांकन मिळालेल्यांमध्ये भारताचा धडाकेबाज सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे.

दरवर्षी प्रमाणेच या वेळीदेखील ICC ने आपल्या विशेष पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली आहेत. ICC Men's T20I Cricketer of the Year 2022 साठी चार वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंना नामांकन देण्यात आले आहे. यात भारताचा सूर्यकुमार यादव तर आहेच पण त्याशिवाय आणखीही तीन स्टार खेळाडू आहेत.

हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी खरंच खूप खास गेले. त्याने यावर्षी T20 फॉरमॅटमध्ये 187.43 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 1,164 धावा केल्या आहेत. या वर्षात त्याने 68 षटकार मारले आहेत. T20 मध्ये त्याने यावर्षी नऊ अर्धशतके आणि दोन शतके झळकावली. तसेच तो सध्या ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा T20 फलंदाज आहे. पण त्याला टक्कर देण्यासाठी आणखी ३ खेळाडूही सज्ज आहेत. पाहूया कोण आहेत ते...

यातील पहिला म्हणजे, झिम्बाब्वेचा अष्टपैलू कर्णधार सिकंदर रझा (Sikandar Raza). त्याच्यासाठीही हे वर्ष खूप खास होते. विशेषत: टी२० विश्वचषकात त्याने अप्रतिम खेळ करून दाखवला. यावर्षी त्याने T20 मध्ये 150 च्या स्ट्राइक रेटने 735 धावा केल्या. त्याचबरोबर २५ विकेट्स घेतल्या. टी20 विश्वचषकात पाकिस्तानवरील झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक विजयात सिकंदरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

याशिवाय IPL लिलावातील सर्वात महागडा खेळाडूही यात आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनलाही (Sam Curran) नामांकन मिळाले आहे. यंदाच्या T20 विश्वचषकात करन 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला होता. त्याने 13 विकेट्स घेतल्या होत्या. संपूर्ण वर्षात त्याने 19 सामने खेळले, ज्यात त्याने 25 विकेट्स आणि 67 धावा केल्या. त्याच्या शानदार खेळामुळेच त्याच्यावर IPL Auction मध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी बोली लागली.

फलंदाजी आणि यष्टिरक्षणामुळे पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही (Mohammad Rizwan) या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याने 25 T20 सामन्यात 996 धावा केल्या आहेत. त्याने नऊ झेल आणि तीन स्टंपिंगही केले आहेत. रिझवानचे या वर्षी टी२० मध्ये १० अर्धशतके ठोकली आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे, तो सध्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.