आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या मोठ्या स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे तर उप कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे.
भारतीय संघात तिलक वर्माला संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, काही अनुभवी खेळाडूंना प्रतिक्षेत ठेवण्यात आलं.
फिरकीपटू युझवेंद्र चहलला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आलं. त्याला २०२१च्या विश्वचषकात देखील संधी मिळाली नव्हती. त्यानंतर २०२२ च्या विश्वचषकात चहलला संघात स्थान मिळालं पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अनुभवी सलामीवीर शिखर धवनला संधी मिळेल असं अपेक्षित होतं. पण, गब्बरला देखील स्थान मिळालं नाही. तो डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेनंतर संघाबाहेर आहे.
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचीही निवड झाली नाही. भुवी हा भारतातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला आशिया चषक २०२३ साठी बॅकअप म्हणून ठेवण्यात आलं आहे. त्याची मुख्य संघात निवड झाली नाही. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल तरच त्याला संधी मिळेल. एकूणच राखीव खेळाडू म्हणून सॅमसन संघासोबत असेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा हिस्सा असलेल्या रवीचंद्रन अश्विनला आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आलं. WTCच्या फायनलमध्ये देखील त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं.
३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार असून सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असतील.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव खेळाडू).