INDw vs AUSw, T20 World Cup: फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टन Harmanpreet Kaur ने दिली 'वॉर्निंग'

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्यासाठी उतरणार

Harmanpreet warning Australia, INDw vs AUSw T20 World Cup 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार झाला.

आयर्लंडच्या डावाच्या ९व्या षटकात अचानक पाऊस आला आणि त्यानंतर खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा संघ ५ धावांनी मागे राहिला आणि टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात आले.

या विजयानंतर आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या सामन्यात भारताला २०२० च्या टी२० विश्वचषक फायनलचा बदला घेण्याची संधी आहे. पुरूषांच्या क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मैदानावर टशन अन् खुन्नस पाहायला मिळतेच. पण आता महिला क्रिकेटमध्ये तोच राडा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आतापर्यंत या स्पर्धेत महिला संघाला प्रेरित केले असून दमदार कामगिरी करण्यासाठी कायमच पाठिंबा दिला आहे. तशातच आता सेमीफायनलचा सामना तुल्यबळ आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी असणार आहे. त्याच दरम्यान, हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियन संघाला 'वॉर्निंग' दिली आहे.

आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीतने पुढील सामन्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. ती म्हणाला, "टीम इंडिया मुक्तपणे क्रिकेट खेळणार आहे. आयर्लंड विरूद्धचा सामना आमच्यासाठी चांगला आणि फायद्याचा होता. स्मृती मानधनाने धावा केल्या, त्याचा आम्हाला उपयोग झाला जे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे."

"जेव्हा स्मृती मानधना आम्हाला चांगली सलामी करून देते तेव्हा आम्ही नेहमीच दमदार कामगिरी करतो नि मोठी धावसंख्या उभारतो. उपांत्य फेरी गाठणे ही मोठी गोष्ट आहे. आम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहोत आणि आम्ही जिंकण्यासाठी खेळणार आहोत. आम्हाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेट खेळायला आवडतं. हा सामना दोघांसाठी 'करा किंवा मरो'चा असणार आहे त्यामुळे आम्ही बिनधास्त आणि मुक्तपणे खेळायचं ठरवलंय," अशा शब्दांत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाला ताकीद दिली.