२००७ सारखाच अजब योगायोग; भारताने तेव्हाही पाकिस्तानला हरविलेले, नंतर सुपर ८ मध्ये पहिला सामना हरलेला

India Semifinal Scenario : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाच्या बाबतीत २००७ सारखाच योगायोग जुळून येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतरही भारत कसा ठरू शकतो विश्वविजेता? वाचा सविस्तर.

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर आकडेवारी आणि योगायोग अनेकदा मोठी भूमिका बजावतात.

सध्या भारतीय संघाच्या बाबतीत असाच एक अजब योगायोग जुळून येत आहे, जो २००७ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाची आठवण करून देतो.

२००७ मध्ये जेव्हा भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता, तेव्हाही काही घटना नेमक्या अशाच घडल्या होत्या.

१. पाकिस्तानवर विजय: २००७ मध्ये भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. २०२६ मध्येही भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला धूळ चारली आहे.

२. सुपर-८ मधील पहिला पराभव: २००७ मध्ये भारताने सुपर-८ चा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला होता. २०२६ मध्ये भारताला सुपर-८ च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

३. पुनरागमन: २००७ मध्ये पहिल्या पराभवानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करत जेतेपद पटकावले होते. आता २०२६ मध्येही तशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारताचा सध्याचा नेट रन रेट उणे ३.८० (-३.८०) आहे. अशा परिस्थितीत सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला खालील गोष्टींची गरज आहे:

मोठे विजय: २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वे आणि १ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला केवळ जिंकावेच लागणार नाही, तर विजयाचे अंतर मोठे ठेवावे लागेल.

नशिबाची साथ: जर दक्षिण आफ्रिकेने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर भारताचा रस्ता सोपा होईल. मात्र, जर आफ्रिका एखादा सामना हरली, तर प्रकरण पुन्हा रन रेटवर येईल.